शाहरुख खान
मुंबई, 15 डिसेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या पठाण या सिनेमामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. पठाण सिनेमा बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अशातच सिनेमातील बेशरम रंग या गाण्यामुळे हा वाद आणखीच चिघळल्याचं पाहायला मिळतंय. गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकीनीमुळे देशातील वातावरण खवळलं आहे. दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे हिंदूचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पठाण सिनेमामुळे निर्माण झालेल्या वादावर इंदौरमध्ये शाहरुख खानचे पोस्टरही जाळण्यात आले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ट्रोलिंगबाबत अखेर स्वत: शाहरुख खाननं मौन सोडलं आहे. कोलकत्ता चित्रपट महोत्सवात शाहरुखनं सोशल मीडियाबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. 28व्या इंटरनॅशनल कोलकत्ता फिल्म फेस्टिव्हलच्या उद्धाटनासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना निमंत्रण देण्यात आलं हतं. ज्यात अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, शत्रुघ्न सिंहा राणी मुखर्जीसह शाहरुख खान यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या उद्धाटनानंतर मनोगत व्यक्त करताना शाहरुखनं सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या निगेटिव्हिटीबद्दल भाष्य केलं. हेही वाचा - Besharam Rang Controversy: कोणी घालायला लावली दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी? समोर आलं नाव शाहरुखनं म्हटलं, माणसाला मर्यादा घालणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या संकुचित दृष्टीकोनावर सोशल मीडियावर सुरू आहे. मी असं वाचलं आहे की, नकारात्मक वातावरणात सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक केला जातो. जेव्हा नकारात्मक विचार अशा गोष्टींमुळे एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम हा फूट आणि विध्वंस असाच असतो. शाहरुख शेवटी म्हणाला, जग काहीही करू देत पण आमच्यासारखे लोक नेहमी सकारात्कम राहतील.
इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल कोलकत्त्यात बोलताना शाहरुखनं केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या निगेटिव्हिटीबद्दल बोलल्यानंतर शाहरुखनं भाषणाच्या शेवटी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं दमदार आवाजात म्हटलं, तुमचे सीटबेल्ट नीट बांधून घ्या. कारण आता हवमान खराब होणार आहे. आम्ही काही दिवस इथे येऊ शकलो नाही तुम्हाला भेटू शकलो नाही. आता जग सामान्य झालं आहे. सगळे आनंदात आहेत. मी सगळ्यात आनंदी आहे आणि मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की, मी, तुम्ही आणि आपल्यासारखे सगळे पॉझिटिव्ह लोक जिवंत आहोत.
पठाण या सिनेमातून शाहरुख तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शाहरुखसाठी हा सिनेमात अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे. पण सध्या सुरू असलेल्या वादामुळे सिनेमा प्रदर्शनानंतर वाद होण्याची शक्यता आहे.