नवी दिल्ली 25 मे : बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) दबंग खान म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या 23 वर्षांपासून चित्रपटात काम करणाऱ्या सलमानचं फॅन फॉलोईंग (Fan Following) जरादेखील कमी झालेलं नाही. वयाच्या 55 व्या वर्षीही सलमान खानचा फिटनेस (Fitness) पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. त्याचे चाहते त्याच्या बॉडीवर फिदा असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खाननंही आपल्या बॉडीवर लक्ष केंद्रित केलं असून तो जिममध्ये (Jym) बराच वेळ घाम गाळत असतो. सलमान खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा रोमँटिक हिरो अशी त्याची प्रतिमा होती. तो निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडे आपले फोटो घेऊन जात असे, त्यावेळी त्याची शरीरयष्टी किरकोळ असल्यानं अनेक ठिकाणी नकार मिळत असे. त्यामुळं त्यानं पिळदार बॉडी बनवायचा निश्चय केला आणि आपल्या फिटनेसकडं लक्ष द्यायला सुरुवात केली. अर्थातच तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी संघर्ष करण्याच्या काळात जिममध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे आणि घरूनही त्याला फार पैसे मिळत नसायचे. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी तो चक्क एका भैय्या जिममध्ये (Bhaiyya Jym) जात असे. भैय्या जिम म्हणजे बिहारी भैय्यानं सुरू केलेलं जिम नव्हे; तर ते होतं बांद्रा फिजिकल कल्चरल असोसिएशन (BPCA Jym) जिम. आयबी टाइम्समध्ये सलमानच्या या भैय्या जिमबद्दल सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली आहे. सलमानचे वडील प्रसिद्ध चित्रपट लेखक सलीम खान यांनी कोणत्याही जिमची फी भरण्यास नकार दिला होता. मात्र, सलमानला तर जिममध्ये जाऊन बॉडी बनवायची होती. अखेर कमी पैशात काम होईल अशी ही भैय्या जिम त्यानं शोधली. या जिममध्ये येणारा तो एकटाच नव्हता तर रोनित रॉय, शहजाद खान, रफिक काझी, इक्बाल असे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे उमेदवारही यायचे. 1925 मध्ये स्थापन झालेलं हे भैय्या जिम सेंट मार्टिन रोडवर माला सिन्हा आणि धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ होतं आणि या जिमची वार्षिक फी फक्त 60 रुपये होती. विशेष म्हणजे आजही ही जिम सुरू आहे. आता या जिमच्या भिंतीवर सलमान खानचे फोटो झळकत असतात. त्यावेळी सनी देओल, अमृता सिंग यांच्यासारख्या कलाकारांना सलमान वांद्र्याच्या (Bandra) प्रसिद्ध सी रॉक हॉटेलमधील जिममध्ये जाताना बघत असे. त्याकाळी त्या जिमची वार्षिक फी 10 हजार रुपये होती.