renuka shahane Rima Lago
मुंबई, 28 एप्रिल : ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा आजही तितक्यात आवडीनं पाहिला जातो. सिनेमातील सलमान आणि माधुरीच्या व्यक्तिरेखेशिवाय वहिनीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री रेणूका शहाणेची भूमिका देखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली. सिनेमातील रेणूका शहाणे यांचा पायऱ्यावरून पडण्याचा सीन पाहून आजही अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी येतं. पण तुम्हाला माहिती आहे का रेणूका शहाणेसाठी हा सीन करणं फार कठीण होतं. तिच्या या सीननंतर सेटवरचे सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ रडायला लागले होते. इतकंच काय तर सिनेमात रेणूकाच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री रिमा लागू देखील ढसाढसा रडू लागली होती. अभिनेत्री रेणूका शहाणेनं एका मुलाखतीत सिनेमातील पडद्यामागचा हा किस्सा सांगितला होता. सिनेमाचे डायरेक्टर सूरज बडजात्या यांनी तर अभिनेत्री रेणूकाची या सीननंतर हात जोडून माफी मागितली होती. तेव्हा रेणूका यांना ते माफी का मागत आहेत हेच कळलं नव्हतं. त्या त्यांना म्हणाल्या होत्या की, “तुम्ही माझी माफी का मागत आहात. हा सीन सिनेमाच्या स्क्रिप्टचा भाग आहे. इतकंच नाही त्या सीनसाठी ज्या पायऱ्या वापरण्यात आल्या होत्या त्या देखील चांगल्या होत्या. त्याने माझ्या शरिराला दुखापत झाली नव्हती”. हेही वाचा - ‘क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..’ अरूंधतीच्या रेट्रो लुकनं वेधलं लक्ष रेणूका शहाणे पुढे म्हणाल्या, “ऑनस्क्रिन मरण्याचा अभिनय करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. सूरज बडजात्या यांना माझा चेहरा फार शिथिल हवा होता. माझ्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव त्यांना नको होते. माझे डोळे तेव्हा सारखे उघडझाप होत होते. त्यांनी मला आरामात श्वास घेण्यासाठी सांगितलं होतं. तुम्ही सिनेमा आणि तो सीन नीट पाहिला तर त्या सीनमध्ये माझे डोळे पूर्णपणे बंद दिसत आहेत”.
त्या सीननंतरचा किस्सा सांगताना रेणूक शहाणे म्हणाल्या, “जेव्हा सूरज यांनी सीननंतर कट असं सांगितलं तेव्हा तिथे असलेल्या सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सगळ्यात जास्त भावुक तर रिमा लागू झाल्या होत्या. त्या भूमिकेत इतक्या शिरल्या होत्या की त्यांचे अश्रू अनावर झाले. मेकअप रूममध्ये गेल्यानंतरही त्या बराच वेळ रडत होत्या”. रेणूक शहाणे पुढे म्हणाल्या, “रिमा ताई रडायच्या थांबतच नव्हत्या. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना मिठी मारल्या. त्यांना म्हटलं, शांत व्हा. हे प्रत्यक्षात नाही घडलेलं. त्या सीनमधून बाहेर येण्यासाठी रिमा लागू यांना बराच वेळ लागला होता”.