मी वसंतराव! 13 आठवड्यांचा यशस्वी प्रवास; 'या' थिएटरमध्ये सुरू आहे सिनेमा
मुंबई, 24 जून: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सांगितिक सुरांची सुरेल मैफिल अजूनही अविरतपणे सुरू आहे. मी वसंतराव ( Me Vasantrao) या सिनेमाच्या माध्यमातून शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे ( Vasantrao Deshpande) यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाला. निपूण धर्माधिकारी ( Nipun Dharmadhikar) दिग्दर्शित आणि गायक अभिनेता राहूल देशपांडे ( Rahul Deshpande) अभिनीत मी वसंतराव या सिनेमाने 13 आठवड्यांचा दमदार प्रवास पूर्ण केला आहे. 1 एप्रिल 2020 रोजी सिनेमा प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता सिनेमाला 13 आठवडे आणि 82 दिवस पूर्ण केले आहेत. सिनेमावर आजही हाऊसफुल्लची पाटी झळकताना पाहायला मिळतेय. गायक आणि अभिनेता राहूल देशपांडे याने सिनेमाच्या यशाची बातमी सर्व रसिक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचा जीवन प्रवासाची सांगितिक सुरेल यात्रा मी वसंतराव या सिनेमाच्या निमित्तानं प्रेक्षकांना अनुभवता आली. सिनेमानं दमदार 13 आठवडे पूर्ण करत आजही थिएटरमध्ये हाऊसफुल्लची पाटी झळकवली आहे. पुण्यातील सिटी प्राइड थिएटरमध्ये ( City Pride Pune) मी वसंतराव हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शनिवारी आणि रविवारी दुपारी 4:30 चा शो पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. 23 जूनचा सिनेमाचा शो हा हाऊसफुल्ल असल्याचं राहूल देशपांडेनं शेअर केलं आहे. मराठीला सिनेमावर प्रेक्षाकांचं असलेलं हे प्रेम पाहून मराठी सिनेमा नक्कीच सातासमुद्रापार अटकेपार झेंडा फडकवणार आहे.
हेही वाचा - Manasi Naik: रिक्षावाला फेम मानसी नाईक रमली विठुरायाच्या भक्तीत, पाहा हा सुंदर video मी वसंतराव सिनेमा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही पाहिला गेला. सिनेमातील गाण्यांनी आणि मी वसंतरावांच्या जीवनप्रवासानं प्रेक्षाकांना थक्क करुन सोडलं. सिनेमाचा दिग्दर्शक निपूण धर्माधिकारीनं मी वसंतराव सिनेमाच्या निमित्तानं त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. जीवनपट कसा असावा याचं उत्तम उदाहरण निपूणनं घालून दिलं. त्याच्या दिग्दर्शनाला तोड नाही. सिनेमाची कथा त्यानं ज्या प्रकारे रंगवली आणि प्रेक्षकांसमोर मांडली ती अद्वितीय होती. राहूल देशपांडेचं सुरेल संगीत आणि सहज सुंदर अभिनय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. सिनेमातील सगळ्यांचं उत्तम अभिनय शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांनी दमदार अभिनयाचा ठसा सिनेमात उमटवला. त्यामुळेच आज 13 आठवड्यातही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.