मुंबई 08 ऑगस्ट: मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे. आज प्राजक्ता 34 व्या वर्षात पदार्पण करत असून तिचा आत्तापर्यंत एक अभिनेत्री म्हणून प्रवास फारच उत्तम राहिला आहे. पण प्राजक्ताने कधीच ठरवून या क्षेत्रात पाऊल ठेवलं नाही तर ती अपघाताने अभिनेत्री झाली असं समोर येत आहे. प्राजक्ताने स्वतःच यासंबंधी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. प्राजक्ता ही अप्रतिम नृत्यांगना आहे हे तर सर्वानाच माहित आहे. (prajakta mali actress journey) प्राजक्ताला डान्स विषयातच करिअर करायचं होतं पण ती अगदी अपघाताने अभिनय क्षेत्रात आली असं तिने सांगितलं. तसंच अगदी बरीच वर्ष या गोष्टीकडे ती फार सिरीयस होऊन बघत नव्हती असं सुद्धा ती म्हणाली. दिल के करीब कार्यक्रमाच्या वेळी तिने असं सांगितलं की, “मी मूळची पुण्याची असून ललित कला केंद्रात मी नृत्य विषयात MA करत होते. त्यावेळी योगायोगाने डान्स ग्रुपमधील एका मुलाने मला पाहिलं आणि तांदळा सिनेमात मला अगदी छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर त्या सिनेमाच्या सेटवर असलेल्या एका असिस्टंट डायरेक्टरने मला गुड मॉर्निंग महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या ऑडिशनला पाठवलं आणि माझी निवड झाली. हे मी कधीच प्लॅन केलं नव्हतं तर हे एकातून एक आपोआप जुळत गेलं. मी कधीच ठरवू अभिनय क्षेत्रात आले नाही कारण माझं सगळं लक्ष नृत्याकडेच होतं.” “आणि खरं सांगायचं तर आधी निवेदन आणि काही भूमिका केवळ मी टीव्हीवर दिसते आणि काही मोजके पैसे कमवता येतात यासाठी एक आकर्षण म्हणून करत होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यातून पैशाचा प्रश्न सुटत होता. मी शिक्षण पूर्ण केल्यावर मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि अगदी जुळून येति रेशीमगाठी या मालिकेनंतर मला या क्षेत्राचं गांभीर्य जाणवलं. हे ही वाचा- Big Boss Marathi 4: ‘हे’ आघाडीचे कलाकार असणार बिग बॉस मराठीचा भाग? अनेक नावांची होतेय चर्चा तोवर मी फक्त मोठी मालिका आहे रोल छान आहे म्हणून करत होते. पण मालिकेने मला मिळालेली लोकप्रियता, प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे सगळं जाणवल्यावर मला या कामाचा सिरियसनेस कळला आणि मी पूर्णपणे अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवलं. मी तसं फार काम केलं नाही पण मोजक्या कामात मला अनेक पटींनी प्रेक्षक आणि चाहते यांनी प्रेम दिलं त्याचमुळे मी आज इथवर पोहोचले आहे.”
प्राजक्ताने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. रानबाजार सारख्या वेबसिरीजमध्ये केलेली भूमिका सुद्धा खूप गाजली. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं निवेदन करत आहे. आणि ती निर्मिती क्षेत्रात सुद्धा काही नवे प्रयोग करू पाहत आहे.