कल्पनेपलिकडील वास्तवाची गोष्ट; 'वाय'चा थरारक टीझर प्रदर्शित
मुंबई, 30 मे: अजित सूर्यकांत वाडीकर (Ajit Wadikar ) दिग्दर्शित आणि अभिनेत्री ‘मुक्ता बर्वे’ (Mukta Barve) मुख्य भूमिकेत असलेला ‘वाय’ (Y the Film) हा सिनेमा येत्या 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वाय’चा पहिला लुक समोर आल्यापासूनच सिनेमाप्रती अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. सिनेमाच्या नावावरुन देखील अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वेने हातात मशाल धरली होती. सिनेमाचं हे आगळंवेगळं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलंं. पोस्टरमध्ये मशाल घेऊन नक्की मुक्ता बर्वे कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. सिनेमाविषयी अनेक प्रश्न पडलेले असताना सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. परंतू सिनेमातील गुढ अद्याप कायम आहे. 35 सेकंदाचा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. नक्की काय चालू याचा अंदाज बांधत असतानाच तोंडाला रक्त लागलेला कुत्रा समोर येतो. अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागी झालेल्या मुक्ता दिसते. झोपूतून जागी होत असताना तिला तिच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसतो. तो तिच्या बिछान्यावर पाय देऊन तिच्या जवळ जातो. हेही वाचा - लग्नानंतर हृता बॅक टू सेट! नाटकाच्या प्रयोगानंतर मालिकेच्या शुटींगला सुरुवात हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? असे अनेक प्रश्न टीझर पाहताना प्रेक्षकांना पडत आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 24 जून रोजी सिनेमा पाहिल्यावर कळणार आहे.
‘वाय’ या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असतांना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. याविषयी सांगताना दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणाले, ‘‘वाय’ या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. वाय ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. ह्या टीझरचा आणि ‘वाय’ या नावाचा अर्थ तुम्हां सर्वांना जाणून घ्यायचा आहेच आणि त्यासाठी ‘वाय’ नक्की म्हणजे नक्की पहा." कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित सिनेमाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांनी लिहीली असून पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत. सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वेसह प्राजक्ता माळी देखील प्रमुख भूमिकेत आहे. न्यूज18 लोकमतशी साधलेल्या संवादात प्राजक्ताने हा खुलासा केलाय. मुक्ता आणि प्राजक्ता यांच्याशिवाय सिनेमात आणखी कोणते कलाकार दिसणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.