prapti redkar
मुंबई, 2 मे : छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचे चेहरे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारे असतात. सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण काही जुन्या मालिकांमधील चेहरे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अशीच एक बालकलाकर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीवरील ‘किती सांगाचंय मला’ या मालिकेतील ती छोटी चिमुरडी आता मोठी झाली असून पुन्हा एकदा कलर्स मराठीवरील नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. कलर्स मराठीवर ‘काव्यांजली’ ही नवी मालिका सुरू होतेय. येत्या 29 मे पासून ही मालिका रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली बहिणींच्या नात्याची घट्ट वीण प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. काव्या आणि अंजली अशा दोन बहिणींची सुंदर कहाणी मालिकेत दाखवण्यात येणार आहे. नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हेही वाचा - ‘महाराष्ट्र शाहीर’च्या रिलीजनंतर अंकुशनं केली तिकिट विक्री; दादरच्या ‘त्या’ प्रसिद्ध थिएटरच्या काऊंटरवर दिसला अभिनेता
किती सांगायचंय मला या मालिकेतून पदार्पण केलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर काव्यांजली मालिकेत दिसणार आहे. प्राप्ती या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. किती सांगायचं मला या मालिकेत अभिनेत्री सविता मालपेकर, शर्मिष्ठा राऊत, अभिजीत केळकर, नुपूर परूळेकर सारख्या कलाकारांबरोबर प्राप्तीनं काम केलं. त्यानंतर सोनी वाहिनीवरील ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेतही प्राप्ती दिसली होती. रज्जो ही भूमिका तिनं साकारली होती.
प्राप्ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक कन्सेप्शुअल्स व्हिडीओ आणि गाणी ती करत असते. अनेक प्रसिद्ध रील स्टार्सबरोबर तिचे व्हिडीओ पाहायला मिळत असतात. प्राप्तीच्या छोट्या पडद्यावरील नव्या एंट्रीमुळे तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत तिला शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे ‘ढोलकी’, ‘कॅरी ऑन मराठा’ सारख्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री करिश्मा कुलकर्णी देखील काव्यांजली मालिकेत दिसणार आहे. काव्या ही भूमिका करिश्मा करताना दिसणार आहे. करिश्माची ही पहिलीच मालिका असून ती मराठी प्रमाणे साऊथ सिनेमातही काम करते. नुकताच तिनं एक तेलुगू सिनेमा देखील केला आहे.