मुंबई 04 ऑगस्ट: आपल्या दिलखुलास अंदाजाने ज्यांनी अवघ्या भारताला मोहून टाकलं असे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांची आज जयंती आहे. अवघ्या देशभरातून आजच्या दिवशी त्यांची आठवण काढली जाते. मात्र त्यांच्या जन्मस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बरीच खळबळ उडाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजे मध्य प्रदेशातील खंडवा इथे गौरव दिवस साजरा होत आहे. तीन दिवसीय गौरव दिवसांतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. काल आयोजित केलेला झुंबा डान्स कार्यक्रमाने सध्या खळबळ माजवल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण? किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रोग्रॅममध्ये दिल धडकाए, सिटी बाजाए, आँख मारे या गाण्यावर जिल्हा पंचायत CEO आणि नगर निगम कमिश्नर सविता प्रधान यांनी तुफान डान्स केल्याचा एक व्हिडिओ बराच viral होत आहे. या व्हिडिओमुळे या महिला अधिकारी सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोल होत आहेत. काहींनी तर तर थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट करून कारवाईची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा प्रमुखांकडून एक ट्विट जारी करण्यात आलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं, “खंडवा जिल्हा पंचायत CEO आणि नगर निगम कमिश्नर खंडवा गौरव दिवशी शालेय मुलामुलींवर अश्लील गाण्यांमार्फत कोणता गौरव पुढे नेण्याची शिकवण देत आहेत? आयोजकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.”
किशोर कुमार यांच्या जन्मस्थानी चाललेला हा गौरव सोहळा काहींच्या पचनी पडला नसल्याचं समोर येत आहे. PRअ जनसंपर्क खंडवा या ट्विटर हॅण्डलवरून या झुंबा डान्स कार्यक्रमाचे अपडेट्स शेअर करण्यात आले आहेत.
यामध्ये रस्त्यावर अनेक तरुण आणि शालेय मुलांसह अधिकारी सुद्धा डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र त्यांनी लावलेल्या गाण्यांवरून सध्या त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.