मुंबई 17 जुलै: रणबीर आलियाच्या बहुचर्चित सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ मधील ‘केसरिया’ गाण्याने सगळ्याच चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. आज हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून त्याबद्दल फारच संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सध्या या गाण्यावर नेटकऱ्यांनी मिम्स बनवण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे. या गाण्यावर मिम्स का बनत आहेत? केसरिया गाणं रिलीज झाल्यावर दोन मतं प्रकर्षाने समोर येत होती. एक चाहतावर्ग होता जो गाण्यावर भरभरून प्रेम करत होता तर दुसरीकडे गाण्यातील एका छोट्याशा पार्टमुळे काहींशी घोर निराशा झाली होती. ‘काजल की सियाही से लेखी है तुने न जाणे कितनी लव्ह स्टोरीया” या काही ओळींमुळे सध्या गाण्यावर बरीच टिंगल होताना दिसत आहे. यातील काही खास मिम्स पाहूया.
जेठालालची झकास रिऍक्शन असलेलं एक मीम सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. लव्ह स्टोरीया या ओळींनी चाहत्यांची निराशा केल्याचं उत्तम दर्शन हे मीम घडवत आहे अशी प्रतिक्रिया येताना दिसत आहे.
सध्या केसरिया सॉंग अशा नावाने एक हॅशटॅग सुद्धा ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे. तसंच अनेक मीम पेज याचा फायदा घेऊन इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
केसरिया हे गाणं प्रीतम या संगीतकाराने संगीतबद्ध केलं आहे तर हिंदीमध्ये हे गाणं अरिजित सिंगच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. या गाण्याचं साऊथ इंडियन व्हर्जन सिद श्रीराम या गायकाने गायलं आहे तर याचे शब्द अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत.
या गाण्यातून इशा आणि आर्यन यांची वाराणसीमध्ये घडणारी कलरफुल लव्हस्टोरी दिसून येत आहे.
या गाण्याच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता बरीच ताणली होती. या गाण्याचा स्पेशल टिझर पाहून गाणं नक्कीच अपेक्षा पूर्ण करणारं असेल असा अंदाज चाहते बांधत होते पण गाणं रिलीज झाल्यावर एक वेगळीच प्रतिक्रिया समोर येत आहे.
रणबीर आणि आलिया यांचं हे पहिलं वहिलं गाणं असून त्यातील काही ओळींचं कसं बसं जुळवून आणलेलं यमक काहींना पसंत पडत नसल्याचं दिसून येत आहे. सध्या तरी इंटरनेटवर केसरिया गाण्याच्या मिम्सची लाट आली असून अनेक नेटकरी यात आपले हात धुवून घेताना आणि धमाल मिम्स तयार करताना दिसत आहेत.