The Kashmir Files
नवी दिल्ली, 14 मार्च: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने दणक्यात कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी तब्बल 139% वाढ झाली. 11 मार्च रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटासंदर्भात काँग्रेसने वादग्रस्त ट्विट केले आहे. जे सध्या चर्चेत आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये पंडितांपेक्षा मुस्लीम जास्त मृत्युमुखी पडलेत असा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. काय म्हटले आहे ट्विटमध्ये? ज्यांनी काश्मिरी पंडितांना निशाना बनवलं ते दहशतवादी होते. 1990 ते 2007 या 17 वर्षाच्या काळात दहशतवादी हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली. याच काळात दहशतवाद्यांनी 15 हजार मुस्लिमांची हत्या केली होती. काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडितांचं पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते. ते आरएसएस विचारसरणीचे होते असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
तसेच, काश्मीर पंडितांचे पलायन भाजपा पुरस्कृत वीपी सिंह सरकारच्या काळात सुरू झालं. भाजपा समर्थनात वीपी सिंह सरकार डिसेंबर 1989 मध्ये सत्तेत आले होते. पंडितांचे पलायन त्याच्या 1 महिन्यानंतर सुरू झालं. भाजपानं त्यावर काहीच केले नाही. नोव्हेंबर १९९० पर्यंत वीपी सिंह सरकारला भाजपाने समर्थन दिले. यूपीए सरकारनं जम्मूमध्ये काश्मीर पंडितांसाठी 5242 घरं बनवली. त्याशिवाय पंडितांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आर्थिक मदत केली. कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनेत समाविष्ट केले. वादानंतर हटवलं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियात यूजर्सनं काँग्रेसविरोधात विविध प्रतिक्रिया दिल्या. लोकांनी काँग्रेसला प्रश्न विचारले. त्यानंतर केरळ काँग्रेसनं हे ट्विट डिलीट केले. या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.