Kangna about Lal singh chaddha
मुंबई, 3 ऑगस्ट : बॉलिवूड चित्रपट आणि अभिनेत्याचा वाद हे समीकरण खूप जुनं आहे. बॉलिवूडमध्येही दोन गट आहेत. हे कलाकार आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुर उपयोग करताना दिसतात. काही वेळा एखाद्या प्रसंगावर वक्तव्य करत हे कलाकार प्रेक्षकांचा रोष स्वतःवर ओढून घेतात आणि नवा वाद निर्माण होतो. आता प्रसिद्ध अभिनेता आमिर खानमुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. आमिर खान तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण आता या चित्रपटामुळे नवीनच वाद निर्माण झाला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा ट्रेंड सुरू झाल्याने आमिर खानची चिंता वाढली आहे. त्याने ‘कृपया माझे चित्रपट बॉयकॉट करू नका’ अशी माध्यमांद्वारे विनंती केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा होतेय. पण आता अभिनेत्री कंगना रणौतने या वादात उडी घेत तिचे मत व्यक्त केले आहे. कंगना स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. आताही तिने केलेल्या विधानाबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ यामागे आमिरच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा - Priyanka Chopra: अखेर प्रियांका चोप्रा ‘या’ दिवशी दाखवणार लेक मालतीचा चेहरा; आई मधुने केला खुलासा “आगामी हिंदी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’बाबत सध्या नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. पण यामागचा मास्टरमाइंड खुद्द आमिर खानच आहे. फक्त एक हिंदी विनोदी चित्रपट सोडला तर यावर्षी एकही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेल दाक्षिणात्य चित्रपटच उत्तम कामगिरी करत आहेत.” असं कंगना आपल्या पोस्टद्वारे स्पष्टपणे म्हणाली. पुढे कंगना म्हणाली, “हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला हिंदी चित्रपट यशस्वी कामगिरी करत नाही. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं हे सर्वप्रथम हिंदी चित्रपटसृष्टीने समजून घेतलं पाहिजे.’’ यावेळी तिने ‘पीके’ चित्रपटाचा देखील उल्लेख केला आहे. आमिरच्या या चित्रपटात हिंदू देवतांचा अपमान केला होता. त्यालाच धरून कंगणाने आमिरला ‘तू तुझ्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण चित्रपटांना एखादा धर्म किंवा त्याच्या विचारधारांशी जोडणं बंद कर.’ असं सुनावलं आहे.