मुंबई, 28 जुलै: महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. टेलिव्हिजनवर प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर हृतानं सिनेमात पदार्पण केलं आहे. हृताचा ‘अनन्या’ हा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हृता डॅशिंग अंदाज असलेला ‘टाइमपास 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 29 जुलैला सिनेमा प्रदर्शित होतोय मात्र त्याआधीच सिनेमाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांच्या मनात चांगलाच कल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे. आजवर साधी, सरळ, सोज्वळ भूमिका असलेल्या व्यक्तिरेखा हृताच्या वाट्याला आल्या होत्या. मात्र टाइमपास 3 नंतर हृताची इमेज पूर्णपणे बदलताना दिसणार आहे. सिनेमात हृताचा डॅशिंग अंदाज तर पाहायला मिळणारच आहे मात्र हृता दणकून नाचताना दिसत आहे. याआधी हृताला इतकं भारी नाचताना कधीच पाहिलं नव्हतं. हृता जीव तोडून नाचली असलेली टाइमपास 3 मधील ही गाणी तुम्ही पाहिलीत का ? टाइमपास 3 सिनेमात ‘साई तुझं लेकरू’, ‘लव्हेबल’, ‘कोल्डिंक’, ‘वाघाची डरकाळी’ आणि ‘नजर काढ देवा’ अशी एकूण पाच गाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पाचही गाण्यांना अमितराजनं संगीत दिलं आहे. त्यातील ‘लव्हेबल’, ‘कोल्ड्रिंक’ आणि ‘वाघाची डरकाळी’ या तीन गाण्यांमध्ये हृता दणकून नाचनाता दिसत आहे. कोल्ड्रिंक गाण्यात हृताला नाचताना पाहून तिच्या चाहत्यांची चांगलीच झोप उडाली आहे. तर वाघाची डरकाळी गाण्यातही हृताचा सॉलिड स्वॅग पाहायला मिळत आहे. आर्या आंबेकरच्या आवाजतील लव्हेबल गाण्यात हृता फारचं क्यूट दिसली आहे. हेही वाचा - Timepass 3 बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ; 400 स्क्रिन्स अन् 10,000 शोजसह सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज
‘कोल्डिंक वाटते’ या गाण्याचा एक व्हिडीओ अभिनेत्री हृतानं शेअर केला आहे. सिनेमातील पालवीच्या ठसकेदार भूमिकेसाठी हृतानं देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. वैयक्तिक हृतापेक्षा पालवी ही फारचं वेगळी आहे. त्यामुळे पालवी पडद्यावर साकारणं हृतासाठीही फार चँलेजिंग ठरलं. याविषयी प्रॅक्टिस हॉलमधील कोल्डिंक गाण्याचा व्हिडीओ शेअर करत हृतानं म्हटलं आहे की, ‘माझा पहिला डान्सिंग नंबर! हे करण माझ्यासाठी फार कठीण होतं. टाईमपास 3 हा सिनेमा माझ्यासाठी एक विलक्षण राइड होती. एक कलाकार म्हणून मी जे शोधत ते ते मला यात मिळालं’.
हृतानं पुढे म्हटलं, ‘रावडी पालवी साकारणं असो, हायस्पीड गाण्याचं शूटींग, नेहमी हॅपी मूडमध्ये नाचणं असो, गाण्याचं लिपसिंग करणं असो हे माझ्यासाठी फार खास क्षण होते. सिनेमाचं स्क्रिप्ट रिडिंग, डान्स प्रँक्टिस, शूटिंगचे दिवस हे सगळं माझ्यासाठी फार स्पेशल ठरलं. मला ही संधी दिल्याबद्दल मी दिग्दर्शक रवी जाधव मेघना जाधव यांची नेहमीच कृतज्ञ राहिनं. करिअरच्या पुढच्या वळणावर जाण्याआधी जुलै 2022 माझ्यासाठी नेहमीच सुपर स्पेशल आणि लक्षात राहील’.