मुंबई 23 मे: अभिनेता जितेंद्र जोशीचं (Jitendra Joshi fil) नाव गेल्या अनेक वर्षात भयंकर गाजतं आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला गोदावरी (Godavari marathi movie) हा चित्रपट मराठी चित्रपटाला सातासमुद्रापार अगदी कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes film festival) घेऊन गेला आहे. निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शित मराठी चित्रपट गोदावरीची निवड केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडून निवडण्यात आलेल्या 6 चित्रपटतात केली असून या चित्रपटाचं प्रीमियर ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes 2022) झालं. या बातमीमुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जितेंद्रला मागच्या ५ ते ६ वर्षात प्रेक्षकांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना पाहिलं आहे. व्हेंटिलेटर, बघतोस काय मुजरा कर, चोरीचा मामला या चित्रपटातून जितेंद्रने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गोदावरी हा चित्रपट आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे. नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता. जितेंद्र जोशीने गोदावरीच्या यशाबद्दल सांगितलं की , “ही कलाकृती निशिकांत कामत यांच्या स्मृतीस करत आहे.” जितेंद्र आणि निशिकांत कामत यांचं नातं अत्यंत घट्ट होतं. त्यांच्या अकाली मृत्यूने चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली. जितेंद्रला त्यांच्या जाण्याने अतिशय दुःखच झालं होत. तो अनेक मुलाखतीतून त्यांच्याबद्दल बोलताना दिसतो. नुकत्याच आलेल्या त्याच्या मुलाखतीत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तो सांगतो की, “निशी सर अत्यंत हुशार आणि उत्तम फिल्ममेकर होते. त्यांचं चित्रपटावर प्रेम होतं. त्यांच्या जाण्याची बातमी आली तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. निशी सरांसाठी काहीतरी करावं ही माझी इच्छा मी निखिल महाजनसमोर बोलून दाखवली होती. त्यातूनच गोदावरी चित्रपट अख्खा तयार झाला. चित्रपटावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला याहून चांगली श्रद्धांजली असू शकत नाही यावर माझं आणि निखिलचं एकमत झालं. त्यामुळे गोदावरी हा चित्रपट निशिकांत सरांना अर्पण करत आहोत.” हे ही वाचा- मिडियम Spicey: ललित प्रभाकरचे कुकिंग स्किल्स; किचनमध्ये कापतोय कांदे गोदावरीच्या ट्रेलरमधून हा चित्रपट एका श्रद्धाहीन माणसाचा विश्वास आणि प्रेम शोधण्याचा प्रवास आहे अशी कल्पना येते. गोदावरी हा चित्रपट याआधी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. कोविडच्या काळात याच्या अनेक तारखाही बदलल्या. अजूनही या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाहीये. जितेंद्र जोशीसह या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, संजय मोने, प्रियदर्शन जाधव अशी तगडी स्टारकास्ट आहे. आपल्या करिअरची सिल्वर जुबली अर्थात 25 वर्ष यावर्षी पूर्ण करणारा अभिनेता जितेंद्र जोशी याआधी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून समोर आला आहे. त्याने साकारलेली सेक्रेड गेम्स मधील काटेकरची भूमिका आजही लक्षात आहे.