'रेड कार्पेट'चा 'असा' आहे इतिहास; खास व्यक्तींसाठीच केला जातो वापर
मुंबई, 27 मे: बॉलिवूड असो अथवा हॉलिवूड, रेड कार्पेट (Red Carpet) हा दोन्हीकडील अभिनेते (Actors) आणि अभिनेत्रींसाठी (Actress) औत्सुक्याचा विषय असतो. खास लोकांसाठीच असलेला रेड कार्पेटवरुन चालण्याचा सन्मान मिळावा, असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) पार पडलं. या फेस्टिव्हलदरम्यान अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी रेड कार्पेटच्या माध्यमातून आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. पूर्वीच्या काळी रेड कार्पेट अर्थात लाल गालिचा हे केवळ राजवाड्यांमध्ये पाहायला मिळायचे. त्यामुळे त्याचा संबंध हा केवळ राजा-महाराजांशी होता, असं इतिहासातल्या उल्लेखांवरून दिसतं. काळ बदलला तरी अजूनही याचा वापर खास व्यक्तींसाठी केला जातो. हे ‘रेड कार्पेट’ म्हणजे नेमकं काय, त्याचा रंग लालच का असतो, कलाकारांच्या दृष्टीनं त्याचं काय महत्त्व आहे, असे प्रश्न तुम्हाला अनेकदा पडले असतील. रेड कार्पेटचा खास असा इतिहास आहे. `टीव्ही 9 हिंदी`ने त्याविषयीची माहिती दिली आहे.
खास समारंभांमध्ये दिसणाऱ्या रेड कार्पेटविषयीचे काही संदर्भ इतिहासात सापडतात. हे कार्पेट खास किंवा विशिष्ट अशा व्यक्तींसाठी अंथरलं जातं. अलीकडच्या काळात फिल्म अॅवॉर्ड सोहळ्यांमध्ये दिसणारं हे कार्पेट 1961 मध्ये पहिल्यांदा अॅकॅडमी अॅवार्ड्स (Academy Awards) समारंभात वापरलं गेलं. याचा संबंध खास लोकांशी जोडला गेला आणि त्यानंतर हे हळूहळू खास आणि विशिष्ट लोकांची ओळख बनू लागलं.
हेही वाचा - ‘हे काही आठवडे…’ Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट
`बीबीसी`च्या एका रिपोर्टनुसार, अगामेमनॉन या ग्रीक नाटकामध्ये (Greek Drama) रेड कार्पेटचा संदर्भ आढळतो. ‘रेड कार्पेट हे खास व्यक्तींसाठी असतं, असं त्यातून स्पष्ट होतं. रेड कार्पेटचा संबंध राजा-महाराजांशी असल्याचं दिसून येतं’, असं लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या क्युरेटर सॉनेट स्टॅनफिल यांनी सांगितलं. याशिवाय रेड कार्पेटशी संबंधित अजून एका घटनेचा उल्लेख आढळतो. यावरुन रेड कार्पेट हे खास किंवा विशेष व्यक्तींसाठीच असतं असं स्पष्ट होतं. 1821 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॉनरो (James Monro) कॅलिफोर्नियातल्या जॉर्जटाउन शहरात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी या कार्पेटचा वापर केला जातो, हे यावरून दिसतं.
1922 मध्ये पहिल्यांदा रॉबिन हूड (Robin Hood) चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी इजिप्शियन थिएटरसमोर लांबसडक रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. यानंतर चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारे-तारकांची रेड कार्पेटवरून चालण्याची परंपरा सुरू झाली. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह अन्य काही अॅवॉर्ड्स समारंभांदरम्यान रेड कार्पेटवर चालताना जगभरातील अनेक तारे-तारका आपल्याला पाहायला मिळतात.