मुंबई, 08 मार्च: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) हा टेलिव्हिजन जगतातील एक जबरदस्त टीआरपी देणारा रिअॅलिटी शो आहे. दरम्यान या कार्यक्रमात आजच्या घडीच्या सर्वच सुपरस्टार्सनी हजेरी लावली आहे. कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) हा कार्यक्रम आणि स्वत: कपिल शर्मा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी कपिल शर्माचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमामुळे. हा सिनेमा प्रमोट करण्यास कपिलने नकार दिल्याचा दावा स्वत: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri Twitter) यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर एका चाहत्याला रिप्लाय देताना याबाबत माहिती दिली आहे. या सिनेमात मोठा कमर्शिअल स्टार नसल्याने त्याचं प्रमोशन करण्यास नकार दिल्याचं अग्निहोत्री सांगतात. विवेक अग्निहोत्री सांगतात की, ते स्वत: कपिल शर्माचे फॅन आहेत. पण बॉलिवूडमध्ये नॉन स्टार दिग्दर्शक, लेखक आणि चांगल्या कलाकारांना कुणी विचारत नाही. झालं असं की, एका चाहत्याने त्यांना हा सिनेमा द कपिल शर्मा शो मध्ये प्रमोट करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी या शोवर न दिसण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. हे वाचा- धक्कादायक कारण देत ‘Anupamaa’ फेम मराठमोळ्या अनघा भोसलेने सोडलं अभिनय क्षेत्र त्यांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘मी हा निर्णय नाही घेऊ शकत की कपिल शर्मा यांनी त्यांच्या शोमध्ये कुणाला बोलावलं पाहिजे. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्यांच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. बॉलिवूडबाबत बोलायचं झालं तर, एकदा मिस्टर बच्चन यांनी गांधींबाबत म्हटले होते की- वो राजा हैं हम रंक..’
यानंतर आणखी एक ट्वीट करत अग्निहोत्री म्हणाले होते की, ‘त्यांनी आम्हाला त्यांच्या शो मध्ये बोलावण्यास नकार दिला, कारण आमच्या सिनेमात कोणताही मोठा कमर्शिअल स्टार नाही आहे. बॉलिवूडमध्ये नॉन स्टार दिग्दर्शक, लेखक आणि चांगल्या कलाकारांना कुणी विचारत नाही.’ विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटवर अनेक जण कपिल शर्माला ट्रोल करत आहेत. मात्र कपिल शर्मा किंवा शो च्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर आधारीत आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडिंतांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक अशी तगडी स्टार कास्ट आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाच्या ट्रेलरच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. 11 मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.