बिग बॉस मराठी 4
मुंबई, 22 नोव्हेंबर : ‘बिग बॉस मराठी 4’ चा सीझन जसा जसा पुढे सरकतो आहे तसा तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येतोय. दिवसेंदिवस खेळ अधिक रंजक होत चालला आहे. शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. यासोबत एक एक सदस्य घरातून बाहेर पडत आहेत. नुकतीच घरातून टूकटूक राणीची म्हणजेच यशश्री मसुरकरची एक्झीट झाली आहे. त्यानंतर किरण मानें ना बिग बॉसने स्पेशल पॉवर दिली आहे. आता घरात नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या एक भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय कि स्पर्धकांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पेशल टास्क दिलं आहे. टीमला कॅप्टन पदाचा अधिकार मिळण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हे कार्य असं आहे कि, ‘जी टीम घरातील हत्तीच्या गळ्यात जास्तीत जास्त हार घालेल त्या टीमला कॅप्टन पद मिळेल. आता त्या हत्तीच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्पर्धक एकमेकांत भिडले आहेत. एका टीममध्ये अपूर्वा आणि अक्षय तर दुसऱ्या टीममध्ये प्रसाद आणि तेजस्विनी खेळत आहेत. हेही वाचा - BBM4 : वडिलांची बाईक तिच्या घरासमोर उभी करून…;किरण मानेंनी सांगितली पहिल्या प्रेमाची गोष्ट प्रोमोनुसार तेजू आणि अपूर्वा हार घेण्यासाठी एकमेकांमध्ये भांडायला लागतात. त्यावर प्रसाद अपूर्वाला म्हणतो कि, ‘आरडाओरड आणि भांडण याशिवाय दुसरं काहीच येत नाही तुला.’ हे ऐकून अपूर्वा चांगलीच चिडते आणि प्रसादशी जोरजोरात भांडायला लागते. या दोघांचं भांडण इतकं टोकाला गेलं कि अपूर्वा प्रसादच्या थेट कानशिलात लगावते.
या पोस्टखाली प्रेक्षकांनी केलेल्या कमेंटनुसार मात्र प्रेक्षक अपूर्वावर चांगलेच नाराज झालेले दिसत आहेत. काहींनी तेजुला पाठींबा दर्शवला आहे. तर प्रसादचे चाहते अपूर्वावर नाराज झालेले दिसतायत. ‘अपूर्वा घरी जायची वेळ आली आहे तुझी’, ‘अपूर्वा तू कधीतरी चांगला गेम खेळ’, ‘ओरडला म्हणजे आपण जिंकू असा समज आहे अपूर्वाचा’ अशा शब्दात प्रेक्षकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या सदस्यांना किरण माने घराबाहेर पडले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर किरण मानेंना घराबाहेर न काढता त्यांना एका सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आलं. आता किरण माने या सिक्रेट रुममधून सदस्यांवर नजर ठेवत आहेत. त्यांच्या मागे त्यांच्याविषयी कोण काय बोलतंय, कोण काय गेम करतंय, हे किरण माने त्यांच्या सिक्रेट रुममधून पाहत आहे. त्यामुळे किरण माने खेळातून बाहेर पडला असला तरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला नाही.