नवी दिल्ली, 30 मार्च: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, भोजपुरी सुपरस्टार आणि भारतीय जनता पार्टीचे गोरखपूरमधील खासदार रवी किशन शुक्ला (Ravi Kishan Brother Death) यांचे मोठे बंधू रमेश किशन यांचे निधन झाले आहे. रवी किशन यांचे भाऊ रमेश यांनी आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रवी किशन यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश दीर्घ काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते, मात्र या आयुष्याच्या लढाईत त्यांना विजय मिळाला नाही. रवी किशन यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. रवी किशन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘दु:खद बातमी, आज माझे मोठे बंधू श्री रमेश शुक्ला यांची एम्स रुग्णालयात दिल्लीमध्ये दु:खद निधन झाले. खूप प्रयत्न केले मोठ्या भावाला वाचवण्याचे, पण नाही वाचवू शकलो. वडिलांनंतर मोठा भाऊ गमावणं दु:खदायक आहे. महादेव तुम्हाला त्यांच्या चरणी स्थान प्रदान करतील. कोटी कोटी नमन. ओम शांती’
रमेश किशन यांचे पार्थिव वाराणसीला नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रवी किशनचा भाऊ रमेश जौनपूरच्या केरकटच्या बिसुई बरैन गावात राहत होता. हे वाचा- ‘देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर..’ मोरूच्या मावशीची आठवण सांगताना भरत जाधव भावुक रमेश शुक्ला यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यालयाने देखील ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
योगी आदित्यनाथ कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी महाराज यांनी गोरखपूरचे माननीय खासदार रवी किशन यांचे मोठे बंधू रमेश शुक्ला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून महाराजांनी शोकाकुल परिवाराप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.’