मुंबई 8 मे: बॉलिवूड (Bollywood)अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांची पत्नी आणि भाजप खासदार किरण खेर(Kirron Kher)यांना रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची तब्ब्येत चांगली असून, नुकताच त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा (Covid-19 Vaccine) दुसरा डोसही घेतला. मात्र तेव्हापासून पुन्हा त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. हे बघून अनुपम खेर यांनी एक ट्विट करून किरण खेर यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवू नका अशी विनंती केली आहे. आपल्या पत्नीची काळजी घेण्यासाठी अनुपम खेर यांनी सध्या आपल्या सर्व प्रोजेक्ट्समधून ब्रेक घेतला आहे. ‘किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी पसरणाऱ्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. नुकताच तिनं कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. तेव्हा कृपया नकारात्मक बातम्या पसरवू नका. सर्वांना सुरक्षित राहा, असं अनुपम खेर यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अनुपम खेर यांच्यासह त्यांची आई आणि किरण खेर यांनी नुकताच मुंबई इथं एका रुग्णालयात जाऊन कोविड-19 प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यावेळी त्यांना तिथं पाहिल्यानंतर सोशल मीडियावर किरण खेर यांच्या तब्ब्येतीविषयी नकारात्मक बातम्या पसरू लागल्या. CID मधील अभिजित कोरोनामुळं बेरोजगार; निर्मात्यांकडे मागतोय काम
अनुपम खेर यांच्या विधानानंतर कॉंग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही अनुपम खेर आणि किरण खेर यांना टॅग करत ट्विट केलं आहे. ‘किरण ठीक आहे, ऐकून छान वाटलं. आम्ही त्यांना संसदेत पुन्हा बघण्यास उत्सुक आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. अनुपम खेर आणि किरण खेर या दोघांचे चाहतेही त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत असतात. 31 मार्च रोजी चंदीगडमध्ये (Chandigarh) आयोजित करण्यात आलेल्या एका खास पत्रकार परिषदेत बोलताना चंदीगडचे भाजपा अध्यक्ष अरुण सूद यांनी किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. ‘68 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना गेल्या वर्षी रक्ताचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, पुढील काही दिवस त्या चंदीगडला भेट देऊ शकणार नाहीत.’ असं त्यांनी सांगितलं होतं. यानंतर अनुपम खेर यांनी स्वत: मुलगा सिकंदर याच्याबरोबर एक पोस्ट शेअर करत, किरण मल्टिपल मायलोमा (Multiple Myeloma) या एका प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगानं ग्रस्त असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ती पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान बनून यामधून बाहेर पडेल, असं म्हटलं होतं.