मुंबई, 11 मे: अभिनेत्री अमृता खानविलकर स्टारर चंद्रमुखी सिनेमा (Amruta Khanvilkar Starr Chandramukhi) रोज नवी यशाची शिखरं गाठत आहे. दरम्यान या सिनेमातील सर्वच भूमिकांचं कौतुक होत आहे. अमृता खानविलकरने देखील जगभरात वाहवा मिळवली आहे. अभिनेत्रीचा फोटो आता युएईतील एका प्रसिद्ध मॅगझिनवर झळकला आहे. ‘गल्फ न्यूज टॅबलॉइड’च्या पहिल्या पानावर अमृता खानविलकरचा फोटो झळकला आहे, तोही मराठमोळ्या अंदाजातील. ‘गल्फ न्यूज टॅब्लॉइड’च्या (Amruta Khanvilkar Gulf News Tabloid) पहिल्या पानावर ‘चंद्रमुखी’.. याबाबत सन्मान आणि विशेष भावना आहे.’ अशा शब्दात अमृताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहे. या मॅगझिनमध्ये तिच्याविषयी एक संपूर्ण लेख छापून आला आहे. तो लेख लिहणाऱ्या पत्रकाराचे देखील तिने कॅप्शनमध्ये आभार मानले आहेत. ‘जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा संपूर्ण टीम खास पद्धतीने जिंकल्यासारखे वाटते’, अशी नोटही तिने हे फोटो शेअर करताना लिहिली आहे.
याआधी देखील ती फिल्मफेअरच्या डिजिटल कव्हरवर झळकली होती. FILMFARE च्या DIGITAL COVER PAGE वर झळकणारी पहिली मराठी अभिनेत्री देखील अमृता खानविलकरच आहे. ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi Marathi Movie) ही कलाकृती प्रेक्षकांच्या स्वाधिन केल्यानंतर आता यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि पडद्यावर दिसणारे तसंच पडद्यामागील सर्वच कलाकार चंद्रमुखीचं यश साजरं करत आहेत. 29 एप्रिलला रीलिज झालेला चंद्रमुखी हा सिनेमा काहीच दिवसात सुपरहिट ठरला आहे. सिनेमागृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चे (Chandramukhi Houseful) बोर्ड लागले आहेत आणि हेच या सिनेमाच्या टीमच्या मेहनतीचं फळ आहे. दरम्यान या सिनेमाचा ‘टायटल रोल’ करणारी अमृता खानविलकर बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देत आहे. हे वाचा- Chandramukhi: ‘..आयुष्यभर तुझी ऋणी राहीन’; प्रसाद ओकसाठी ‘चंद्रा’ची भावुक पोस्ट प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय-अतुलचे संगीत तर गुरू ठाकुरने यातील सुंदर गाणी लिहिली आहेत. एक मोठी स्टारकास्ट या सिनेमात आहे. मेट्रोपासून विमानापर्यंत या सिनेमाने प्रमोशनमध्ये देखील कमाल केली आहे. आज सोशल मीडियावरही ‘चंद्रा’, ‘बाई गं..’, ‘तो चांद राती..’ ‘सवाल-जवाब’ या सर्वच गाण्यांवरील व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत, व्हायरल होत आहेत. सध्या थिएटर्समध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला असताना मराठी सिनेमाला प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळणं ही मोठी पोचपावती मानली जात आहे.