अमृता खानविलकर
मुंबई, 07 ऑक्टोबर : यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचा शूरवीर मावळा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगाणार हर हर महादेव हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंच्या प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदा छत्रपती शिवादी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध गायक सिड श्रीराम याच्या आवाजातील गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीत. आता सिनेमातील इतर पात्रांची नावं देखील समोर आलीत. महाराष्ट्राला चंद्रा म्हणून वेड लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोनाबाई देशपांडेंची भूमिका अमृता साकारणार आहे. सिनेमातील अमृताचा पहिला लुक समोर आला आहे. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांचा मोलाचा वाटा आहे. याच सोनाबाईंची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. सोनाबाईंच्या निमित्तानं अमृता पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. अमृताचा हा पहिलाच ऐतिहासिक सिनेमा असणार आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवार साडीतील अमृताचा पहिला लुक समोर आलाय. अमृताला सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. हेही वाचा - ‘मुलुख माझा, हुकुम माझा, भाषा पण माझीच’; राज ठाकरेंच्या दमदार आवाजात ‘हर हर महादेव’चा टीझर प्रदर्शित
हर हर महादेव हा सिनेमा तब्बल 5 भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. मराठी तसेच हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. हर हर महादेव हा पहिला मराठी बहुभाषिक सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्तानं एकाच वेळी अमृतासह मराठमोळे कलाकर इतर भाषिक लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या यशोगाथा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत न राहता देशभरातील बहुभाषिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर विषयी बोलायचं झालं तर अमृताचा नुकताच चंद्रमुखी हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. अमृतानं सिनेमासाठी विशेष मेहनत घेतली होती. अमृतानं सादर केलेली चंद्रा ही लावणी विशेष गाजली. आजही या गाण्यानं महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पुन्हा एकदा अमृताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.