मुंबई, 15 मार्च- संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ (gangubai kathiawadi) हा आलिया भट्टचा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेमामुळे आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी खूप खूश आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ने करोनानंतर रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये भरघोस ओपनिंग मिळवून तिसरं स्थान पटकावलं आहे. हा चित्रपट नुकताच 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. दुसरीकडे या वर्षी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची जबरदस्त अशी कमाई केली होती. चित्रपटातल्या गाण्यांची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहे. गंगूबाई काठियावाडी आणि पुष्पा हे दोन चित्रपट यंदाचे सर्वांत मोठे हिट ठरलेले चित्रपट आहेत. अशातच जर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी एकत्र येऊन चित्रपट बनवला तर तो किती हिट ठरेल, याचा तुम्ही विचार केलाय का? असं विचारण्याचं कारण म्हणजे संजय लीला भन्साळी आणि अल्लू अर्जुन हे एकत्र चित्रपट करणार असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या असून, दोघांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल (video viral) झाला आहे.
अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जाताना दिसत आहे. अल्लू अर्जुनला चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर पापाराझींनी पाहिलं होतं. त्याने लूज फिटिंग पॅन्टसह कॅज्युअल काळा टी-शर्ट घातला होता. अल्लू अर्जुनला संजय लीला भन्साळींच्या ऑफिसबाहेर पाहिल्यानंतर, ते दोघे एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (हे वाचा: प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर ) संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटात अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. परंतु हे दोघं खरंच एकत्र चित्रपट करण्यासाठी भेटले आहेत, की त्यांच्या भेटीमागचं कारण वेगळं आहे, या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे येत्या काळात संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्टमध्ये अल्लू अर्जुन दिसणार की नाही, याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती सांगणं कठीण आहे. संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट कायम वेगळे, भव्य आणि ब्लॉकबस्टर असतात. अल्लू अर्जुनदेखील साउथचा सुपरस्टार आहे. त्यामुळे येत्या काळात या दोघांनी एकत्र चित्रपट केल्यास तो सुपरहिट ठरणार, यात कोणतीही शंका नाही.