दृश्यम 2
मुंबई, 25 नोव्हेंबर : बॉलिवूड सिंघम अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘दृश्यम 2’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले. दिवसेंदिवस चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक गल्ला कमवत आहे. ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने अवघ्या 7 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. दृश्यम 2 च्या नॉनस्टॉप कमाईचा वेग काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं पहायला मिळतंय. अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. व्यापार विश्लेषक सुमित कडेल यांच्या मते, ‘दृश्यम 2’ ने रिलीजच्या 7 व्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. त्यामुळे ‘दृश्यम 2’ ने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 104.54 कोटी रुपये झाले आहे. विजय साळगावकर 7 वर्षांनंतर परतल्यानंतरही त्यांच्याबद्दलची एकेक गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आहे. प्रेक्षक त्याला विसरलेले नाहीत. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘दृश्यम 2’ ने बॉक्स ऑफिसवर 15 कोटींहून अधिक कमाई केली. आता चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे.
अजय देवगणच्या चित्रपटाने यावर्षीचा सुपरहिट चित्रपट भूल भुलैया 2 ला मागे टाकले आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात केवळ 92.05 कोटींची कमाई केली. तर दृश्यम 2 ने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. दृश्यम 2 भूल भुलैया 2 च्या संपूर्ण कलेक्शनला मागे टाकू शकेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दिवसेंदिवस सिनेमा हॉल भरून जात असल्याची परिस्थिती आहे. तिकीट कधी मिळणार आणि चित्रपट बघायला कधी जाणार, याची लोक वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांनी चाहत्यांमध्ये एका चित्रपटाची अशी क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे निर्मात्यांच्या आनंदाला थारा नाही.
‘दृश्यम 2’ ने पहिल्याच दिवशी ‘भूल भुलैया 2’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ सारख्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला. विश्लेषकांच्या मते हा चित्रपट सुपरहिट होण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षक या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाची क्रेझ पाहता प्रेक्षक तिसऱ्या भागाचीही मागणी करत आहे. चित्रपटाला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहता निर्मातेही चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत आहे.