मुंबई 28 एप्रिल**:** आस्तात काळे (Aastad Kale) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. जबरदस्त अभिनयासोबतच तो आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडिंवर तो रोखठोकपणे प्रतिक्रिया देतो. यावेळी त्यानं कोरोनामुळं देशात उडालेल्या हाहाकारावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सद्य परिस्थीतीसाठी त्यानं सत्तेत बसलेल्या राजकीय नेत्यांना जबाबदार धरलं आहे. ‘नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….’ अशा शब्दात त्यानं आपला संताप व्यक्त केला आहे. (Coronavirus in Maharashtra) नेमकं काय म्हणाला आस्तात? आस्तादनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण.. श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही…. अरे हाड….. आम्ही प्रश्न विचारणार…. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला…. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…… नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश…. निरोप घेतो….” त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवश्य पाहा - ‘राजकीय नेत्यांना लॉकडाऊनचे नियम नाही का?’; केदार शिंदेचा रोखठोक सवाल
भारतात मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.