आमिर खान
मुंबई, 06 फेब्रुवारी: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. त्याला बॉलिवूडमध्ये ट्रेंड सेटर असं देखील म्हणतात. त्याच्या चित्रपटांच्या निवडी आणि त्या भूमिकेवर काम करण्याची विशिष्ठ पद्धत यामुळे त्याच्या प्रत्येक कामाचं कौतुक होतं. चित्रपटांमध्ये तो नेहमी विविध प्रयोग करताना दिसतो. तसेच तो त्याच्या सर्व भूमिकांसाठी अधिक मेहनत देखील घेतो. हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. पण आज आमिरविषयी एक रंजक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती म्हणजे आमिरचा पहिला चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉलिवूडच्या त्या लेडी सुपरस्टारसोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता. करोडो सिनेप्रेमींची ती आवडती नायिका होती तरी आमिरने तिच्यासोबत काम करायला का नकार दिला होता जाणून घ्या. आमिरने काम करायला नकार दिलेली ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी आहे. आपल्याला ठाऊकच असेल कि, आमिर खानने स्वतः श्रीदेवीचा चाहता असल्याची कबुली दिली आहे. आमिरला त्या खूप आवडायच्या. पण जेव्हा त्याला श्रीदेवीसोबत चित्रपट करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्याने अभिनेत्रीसोबत चित्रपट करण्यास नकार दिला. हेही वाचा - Imran Khan: बॉलिवूडपासून दूर, पत्नीपासून विभक्त आमिरचा भाचा इम्रान खान पडलाय ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात? गेल्या 30 वर्षांपासून आमिर खान चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. 1988 मध्ये कयामत से कयामत तक या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपर हिट झाला आणि पदार्पणातच आमिर खान रातोरात स्टार बनला. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी त्याची लोकप्रियता पाहून त्याला त्या काळची लेडी सुपरस्टार श्रीदेवी सोबत कास्ट करावे असे ठरवले. श्रीदेवी त्यावेळी देशातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक होती. एवढेच नाही तर आमिर खानने श्रीदेवीसोबत मॅगझिन फोटोशूटही केले होते. या फोटोशूटमध्ये दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. असे असतानाही आमिरने श्रीदेवीसोबत काम करण्यास नकार दिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आमिर खान बाहेर आला आणि त्याने चित्रपटांचे बारकाईने निरीक्षण करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याला श्रीदेवीसोबत काम करण्याची ऑफर आली तेव्हा त्याने वयाच्या अंतरामुळे तो चित्रपट नाकारला. असे म्हटले जाते की या प्रकरणावर आमिर खानने सांगितले की प्रेक्षक श्रीदेवीसोबतची जोडी स्वीकारणार नाहीत कारण ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी दिसली असती.
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात त्याने त्या काळची तरुण नायिका जुही चावलासोबत काम केले होते, यानंतर तिच्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीसोबत काम करणे योग्य ठरणार नाही, असे आमिरचे मत होते. म्हणून त्याने श्रीदेवींसोबत काम करण्यास नकार दिला. त्याच्या या निर्णयाची आजही चर्चा होते.