मुंबई, 29 ऑगस्ट: टीआरपीच्या रेसमध्ये ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका सुरुवातीपासून अग्रेसर राहिली आहे. प्रेक्षकांची विशेष पसंती मालिकेला मिळत आहे. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेचा नवा प्रोमो देखील समोर आला आहे. आणि या प्रोमोनुसार अनिरुद्ध ऐन लग्नाच्या दिवशीच गायब झाला आहे. अर्थातच यानंतर संजनाने घर डोक्यावर घेत याकरता अरुंधतीला जबाबदार धरलं आहे. मात्र चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की नेमका अनिरुद्ध गायब कुठे झाला आहे? अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींना देखील हाच प्रश्न पडला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘अनिरुद्ध देशमुख हरवला आहे’ अशी वर्तमानपत्रातील जाहिरातींप्रमाणे एक पोस्ट शेअर केली आहे. एवढंच नव्हे तर यामध्ये अनिरुद्धचं सविस्तर वर्णन देण्यात आलं असून तो सापडल्यास संजनाला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
देशमुखांच्या समृद्धी बंगल्याचा पत्ता देखील यात आहे. शिवाय जो माहिती देईल त्याला लग्नाला बोलावण्यात येईल असं मिश्किलपणे यात म्हटलेलं आहे. खरं तर हे एक मीम आहे, जे इन्स्टाग्राम युजरने शेअर केले आहे. तेच मिलिंद यांनी अर्थात अनिरुद्धने शेअर केले आहे. मिलिंद गवळी यांनी देखील ‘Where are you?’ म्हणत ही मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान या मालिकेतील कलाकारांचे सेटवरील फोटो व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. संजना-अनिरुद्धच्या लग्नातील संजनाचा नवरीचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गुलाबी साडीतील तिचा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.