धक्कादायक घटना
चितरंजन सिंह, प्रतिनिधी बदायू, 28 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून खुनाच्या, आत्महत्येच्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने माकडाच्या लहान पिल्लाला काठीने जोरदार मारहाण केली. या मारहाणीत ते पिल्लू गंभीर जखमी झाले. रिजवान असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. माकडाच्या पिल्लाला बेदम मारहाण करुन त्याला चिखलात फेकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक युवक हातात काठी घेतलेला दिसत आहे. याप्रकरणी पीएफएचे अध्यक्ष विकेंद्र शर्मा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ही घटना फैजगंज बेहटा क्षेत्राच्या दांवरी गावातील आहे. येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाने माकडाच्या एका पिल्लाला काठीने जोरदार मारहाण केली. तसेच मारहाण करत त्याला तो गावाच्या बाहेरच्या परिसरात घेऊन जाते. त्याच्या मागे त्याचा एक साथीदारही हातात काठी घेऊन सोबत चालत होता. यानंतर या तरुणाने माकडाच्या या पिल्लाला चिखलातील एका खड्ड्यात फेकून दिले. घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक हा व्हिडिओ 26 तारखेचा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या घटनेनंतर हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विकेंद्र शर्मा यांनी फैजगंज बेहटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधिकारी सिद्धांत शर्मा म्हणाले की, याप्रकरणी गुन्हा दाखल केला जात असून पुढील कारवाई केली जाईल.