अटक करण्यात आलेली शिक्षिका
कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी बस्ती, 3 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेश राज्यातील बस्ती जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. ती तब्बल मागील 13 वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षिका म्हणून काम करत होती.
ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी महिला शिक्षिकेला अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली. प्राची तिवारी असे अटक करण्यात आलेल्या महिला शिक्षिकेचे नाव आहे. बस्ती जिल्ह्यात बनावट शिक्षिका आढळल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या तीन महिन्यांत डझनभर बनावट शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही तपास सुरू राहिल्यास बस्ती जिल्ह्यातील हजारो बनावट शिक्षक समोर येतील. काय आहे संपूर्ण घटना - ही धक्कादायक घटना बस्ती जिल्ह्यातील लालगंज भागातील दुबौली प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. येथे प्राची तिवारी नावाची महिला 2010 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ती गोरखपूरच्या रामगढतल पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. तिने खलीलाबाद परिसरात राहणाऱ्या पुनीता पांडे या महिला शिक्षिकेचे प्रमाणपत्र तिच्या नावावर करून घेतले होते. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे प्राची तिवारी विशेष बीटीसीच्या माध्यमातून शिक्षिका म्हणून रुजू झाली आणि 13 वर्षे नोकरीही केली. पण जेव्हा पुनिता पांडेने तिच्या पॅनकार्डद्वारे आयकर भरला तेव्हा त्यात दोन सॅलरी दिसू लागल्या. त्यानंतर पुनिता पांडे हिने याबाबत विभागाकडे तक्रार केली आणि एफआयआर दाखल केला. त्यानंतर तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. बीएसए बस्ती इंद्रजित प्रजापती यांनी सांगितले की, पुनिता पांडे यांच्या तक्रारीवरून रेकॉर्ड तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. एएसपी बस्ती दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, बीएसएच्या तक्रारीवरून, प्राची तिवारीच्या नावावर फसवणूक, रेकॉर्डमध्ये फेरफार आणि बनावटगिरीच्या कलमात एफआयआर नोंदवून प्राची तिवारीला अटक करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.