मुंबई, 13 फेब्रुवारी : पत्नी आणि तिच्या प्रियकाराच्या त्रासाला कंटाळून पतीनं गळफास लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली आहे. या घटनेनं संपूर्ण इंदूर शहरात खळबळ उडाली आहे. हितेश पाल असं या पतीचं नाव आहे. या प्रकरणी लासुदिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तपास अधिकारी बी. एस. कुमरावत यांनी सांगितलं. मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं तपासात पुढं आलं असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. काय आहे प्रकरण? इंदूरमधील महालक्ष्मीनगर येथे हितेश पाल कुटुंबासह राहत होता. त्यांच्या पत्नीचं नाव नीतू आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळताच, हितेशला धक्काच बसला, व त्यानी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी हितेशनं सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये लिहिलं आहे की, ‘माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठोडशी अनैतिक संबंध आहेत. ते मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मी या दोघांना अनेकदा रंगेहाथ पकडलं आहे. नीतू घरी तंत्र-मंत्रही करते. काही दिवसांपूर्वी मी नीतूला कृष्णासोबत बागेत पकडलं होतं.’ फोनवर बोलल्याने प्रेयसीच्या घरच्यांचा राग अनावर, प्रियकराला घरातून बोलावले आणि… सुसाईड नोटमध्ये नेमकं काय? सुसाईड नोटमध्ये पुढं लिहिलं आहे की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून नीतू आणि कृष्णाच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगवर लक्ष ठेवून होतो. यादरम्यान मला समजलं की, नीतू कृष्णाला बागेत भेटल्यानंतर त्याच्या रुमवर जात असे. ती त्याला महागड्या भेटवस्तू द्यायची, आणि तो भाऊ असल्याचं सांगायची. काही दिवसांपूर्वी नीतूनं हद्दच पार केली. तिनं तिचा प्रियकर असणाऱ्या कृष्णाला एक कार भेट दिली. ही कार नीतूच्या नावावर आहे. या प्रकरणात आणखी एका महिलेचाही समावेश असून तिचं नाव राणी उदासी आहे. नीतू, कृष्णा आणि राणी घरी एकत्र तंत्र-मंत्र करत होते. गेल्या 1 वर्षापासून ते मला स्लो पॉयझन देत होते. यामुळे मी सुस्त राहू लागलो. माझे संपूर्ण शरीर काळे झालेय. हे सर्व पोस्टमार्टममध्ये समोर येईलच. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, या तिघांच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी.’ कर्जामुळे दुकान बंद झाले, नैराश्य आल्याने उचललं भयानक पाऊल, जळगावात खळबळ सुसाइड नोटमध्ये हितेशनं त्याच्या संपत्तीबाबतही महत्त्वाची माहिती दिलीय. त्याने नोटमध्ये लिहिलं आहे की, ‘नीतूनं मला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करून घेतली आहे. पण माझ्या मृत्यूनंतर ही संपत्ती मुलगा युवराज आणि आई-वडिलांना द्यावी. तिला मला मारायचं होतं. त्यामुळेच तिनं सर्व ठिकाणी नॉमिनीमध्ये तिचं नाव टाकलं आहे.’ दरम्यान, हितेशनं सुसाईड नोटमध्ये इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख केलाय. तसंच काही लोकांचे आभार मानलेत, व मुलाला आणि आई-वडिलांना मदत करण्याची विनंती केलीय. या प्रकारानं मात्र इंदूर हादरलं आहे. पोलीस अधिक तपास करत असून, तपासातून आणखी कोणकोणते धक्कादायक खुलासे होतात, हे लवकरच स्पष्ट होईल.