JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / कोब्रा चावल्यानेही तो मेला नाही म्हणून..., हत्या अशी की वाचून तुम्हीही हादराल! धसई हत्यांकाडाची Inside Story

कोब्रा चावल्यानेही तो मेला नाही म्हणून..., हत्या अशी की वाचून तुम्हीही हादराल! धसई हत्यांकाडाची Inside Story

हत्याकांडाची ही स्टोरी वाचुन तुम्हालाही हादरा बसेल.

जाहिरात

अटक करण्यात आलेले आरोपी.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुनील घरत, प्रतिनिधी कल्याण, 27 जून : गेल्या काही दिवसांपासून नोकरीसाठी लाखो रुपये लबाड नोकरी सम्राटांच्या घशात घालण्याऱ्या कल्याण चक्की नाका येथील फसवणूक झालेल्या गोपाळ रंग्या नायडू (वय-62) या सेवानिवृत्त रेल्वे टिसी व पडघा चिंचवलीचा बाळू शंकर पाटील (वय-75) या दोघांचीही हत्या झाली. पण यानंतर पोलिसांनी कसून तपास करत शहापूर धसई येथील अरूण जगन्नाथ फर्डे आणि टिटवाळात राहणारा रमेश मोरेश्वर मोरे या लबाड, निर्दयी नोकरी सम्राटांचे हे हत्याकांड उजेडात आणले. पण ज्या पद्धतीने या प्रकरणातील बाबी समोर येत आहेत, ते वाचून तुम्हालाही हादरा बसेल. जाणून घ्या, या प्रकरणाची इनसाईड स्टोरी. याप्रकरणी कल्याणचा सुप्रसिद्ध सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळे आणि रमेश मोरेचे साथीदार सोमनाथ जाधव (रा. टावरीपाडा कल्याण) आणि नारायण तुकाराम भोईर (रा. भुवनगाव, मुरबाड) आणि जयेश भास्कर फर्डे (रा. धसई, ता.शहापूर) यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी रमेश मोरे अद्यापही फरार आहे. टिटवाळा येथील रमेश मोरेश्वर मोरे हा नामचीन रणजी क्रिकेटपटू आहे. इंग्लंड रिटर्न खेळाडू म्हणून कल्याण सुभाष मैदानात रुबाबदार मान मिळायचा. थेट सचिन तेंडुलकर सुद्धा त्याला ओळखायचा असं मैदानावर नवीन खेळाडूंना तो फुशारकीने सांगायचा. खेळाडूंना क्रिकेट कोचिंग करताना रेल्वे टिसी गोपाळ रंग्या नायडू या क्रिकेट फैनशी त्याची ओळख झाली. यानंतर अनेक महिने या दोघांची यारी दोस्ती आपोआपच दारुच्या पार्ट्यांमध्ये स्थिरावली. टिसी गोपाळ नायडू कमालीचा दारु पार्टी शौकीन होता. त्याचा मित्र परिवार मोठा होता. यादरम्यान, नायडूला मोरेवर विश्वास बसला होता. कित्येक जण, “ये नायडू साब,आपकी बहुत पहचान है, नोकरी के लिए देखो, हमारे रिशतेदार जितना पैसा लगेगा उतना देगे” असे त्याला बोलायचे. त्यामुळे रमेश मोरे याने झटपट श्रीमंत होण्यासाठी नेमकी हीच संधी साधली. यानंतर टिसी गोपाळ रंग्या नायडू आणि बाळू पाटील यांना त्याचे मंत्रालय, रेल्वे, महापालिका व इतर सरकारी अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असून पैसे मैनेज केले. तर नोकरी हमखास मिळणार, अशी खोटी बतावणी केली. नायडू आणि पाटील यांनी वेगवेगळ्या दिवशी मोरेचे कार्यालय गाठले. बाहेरच त्यांना अगदी अपटुडेट, पॉश कडक कपडे घातलेला धसईचा अरुण फर्डे भेटला. मोरे साहेब, खूप खूप बिझी आहेत. कालच दिल्लीवरुन विमानाने आले. आज मंत्रालयात बैठक आहे, असे त्याने त्यांना सांगतले. ओळखीच्या, नातेवाईक आणि मित्र मंडळ परिवाराला नोकरी सम्राट रमेश मोरेला भेटून नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असल्याचे सांगितले. नोकरीकरिता लोकांकडून नायडूने 16 लाख रुपये तर बाळू पाटीलने लोकांचे तब्बल 25 लाख रुपये घेतले आणि ते पैसे रमेश मोरे व अरुण फर्डेला दिले. मात्र, पैसे देऊनही 2021 ते 2022 अखेर कोणालाही नोकरी लागली नाही. यानंतर 2023 ला नोकरी सम्राटांनी लाखो रुपयांचा चूना लावून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. दोघांनीही अक्षरशः मोरे आणि फर्डेला नोकरी आणि पैशांसाठी लोटांगण घातले. दोघांच्या घरांचे उंबरठे झिजवले. दररोज सकाळी, रात्री मोबाईलवर, घरी, रस्त्यावर पैशांची मागणी करु लागले. दरम्यान, 3 जून रोजी तुम्हाला काही पैसे देतो. तुम्ही भेटा. बरेच दिवस झाले आपण एकत्र येऊन पार्टी केली नाही. मस्त पार्टीही करुयात, असा निरोप टिसी गोपाळ रंग्या नायडूला दिला. यानंतर आपल्या नेहमीच्या रिक्षाचालक बरोबर नायडू आणि मोरे, फर्डेपार्टी साठी निघाले. हाजी मलंग येथील खोणी गावाजवळ त्यांनी पार्टी केली. नायडूला दोघांनी जाम दारू पाजली. इतकी की, त्याची शुद्ध हरपली आणि नायडू रिक्षातच सीटवर पडला. त्याची ही अवस्था पाहून रमेश मोरे आणि अरुण यांनी एकमेकांना इशारे केले. यानंतर त्यांनी रिक्षातील पिशवीमधून काचेच्या बरणीत भरून ठेवलेला नागोबा दिसताच दोघांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि नायडुच्या दोन्ही बाजूला बसून नायडूचा हात झाकण काढून बरणीत कोंबायला सुरुवात केली. यानंतर बरणीतील कोब्रा नागाने फणा काढून नायडूच्या हाताला, मनगटावर दंश केला. जोराच्या नागदंशाने नायडूने अंग व पाय झटकले. पण तो दारुच्या दशेत होता. त्यामुळे त्याला काहीच कळले नाही. दरम्यान, इकडे मोरे आणि फर्डेने लोकांचे नोकरीचे लाखो रुपये खर्चून टाकले होते. नायडु आणि पाटील यांच्या मागणीने, दररोजच्या तगादा त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली. त्यानुसार, अरुण फर्डे हा सुभाष मैदानावर ओळख असलेल्या कल्याणचा सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळेला भेटला. शहापूर धसईला माझ्या फार्महाऊसवर खूप घुस आणि उंदीर झाले आहेत. मला साप हवा आहे. तू सर्पमित्र आहे. तुला मी या बदल्यात पैसे देतो. यानंतर 3 जून पूर्वी गणेश बाजीराव खंडागळे याने अरुन फर्डेला विषारी कोब्रा नाग 5 हजार रुपयांना विकला. तो नागोबा नायडूच्या हत्येसाठी त्यांनी वापरला. मात्र, नागाने दंश केल्यानंतरही नायडूचा मृत्यू झाला नाही. त्याच्या श्वसनाची क्रिया सुरुच होती. त्यामुळे या दोघांनी त्याला एका खोलीत आणले. त्यानंतरही नायडू दिवस रात्र जिवंत राहिला आणि आपली सर्प दंशाची मोहीम फत्ते न झाल्याने ते तंतरले. त्यामुळे अखेर रमेश मोरेने मध्य रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून रेल्वे टिसी नायडूचा खून केला. तसेच पहाटेच्या सुमारास त्याचे प्रेत धसई शिवनेर येथील अरूण फर्डेच्या शेतात पुरून टाकले. दरम्यान, इकडे नायडूचा मुलगा देवा याने आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. बाळू पाटीलसोबतही भयानक कांड - एक तगादाखोर नायडूचा काटा साफ करून झाल्यावर लाखो रुपये पचविण्यासाठी दुसरा डोकेदुखी ठरत असलेल्या पडघा चिंचवलीचा बाळू पाटील या व्यक्तीलाही संपवण्यासाठी त्यांनी तीच शक्कल लढवली. त्यांनी सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळेला गाठले आणि विषारी कोब्रा नाग विकत घेतला. यानंतर 8 तारखेला बाळू शंकर पाटील (वय 75) यांना पडघा येथे भेटण्यासाठी फोन करुन तुमचे पैसे देतो, पडघा येथे रिक्षाने आलो आहे, असा निरोप दिला. यानंतर बाळू पाटील हेसुद्धा आता पैसे वापस मिळतील या आशेने आले आणि रिक्षात दोघांच्या मध्ये बसले. मात्र, अचानक दोघांनी पाटीलला गच्च पकडून आवळले. तसेच रिक्षातच बरणीत भरून ठेवलेला विषारी कोब्रा नाग जवळ करुन बाळू पाटीलचा हात बरणीत कोंबला आणि यामुळे नागोबाने त्यांना तीन वेळा दंश केला. सर्पदंशाने पाटील यांची बोबडी वळली. तोंडातून पांढरा फेस निघू लागला. त्यांनी हातपाय झटकले आणि त्यांचे शरीर हळूहळू मंदावताच रिक्षातून पाटीलला रस्त्यावर टाकून दोघांनी धूम ठोकली. या दोघांना असे वाटले आता आपली सुटका झाली. मात्र, पोलीस धसई मर्डर प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई केली. अरुण फर्डेने नायडू आणि पाटीलची हत्या केल्यानंतर घरी आल्यावर तो अस्वस्थ झाला. त्याला जेवणही जात नव्हते. झोपायला डोळे मिटून घेतले की नायडू आपल्या शेतात पुरून ठेवलेल्या जागेतून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचा भास अरुणला होऊ लागला. घराच्या कोपऱ्यात, खुर्चीवर, गाडी वर नायडू दिसू लागला. अरुण अस्वस्थ होत होता. मात्र, काहीही बोलू शकत नव्हता. त्याच्या या अशा वागण्यामुळे त्याच्या घरातील लोक बुचकळ्यात पडले. शेतात नायडूला पुरलेल्या जागेवर जाऊन तो वारंवार खात्री करून घेत होता. शेवटी वैतागून अरुणने स्वतः हून 10 जून रोजी मध्यरात्री शेतात पुरून ठेवलेल्या जागेतून मातीचा ढिगारा उपसून गोपाळ रंग्या नायडूचा सांगाडा बाहेर काढून टाकला. तसेच कुणी अज्ञात व्यक्तीने हा सांगाडा टाकल्याचे सांगून अरुण फर्डेने खोटा कांगावा केला. यानंतर 11 जून ला शहापूर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी नायब तहसीलदार बि. घुटे यांच्या समक्ष पंचनामा करून रीतसर गुन्ह्याची नोंद केली. ठाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस हवालदार प्रकाश साहिल वसंतोष सुर्वे, प्रमोद हाबळे, सतिश कोळी, हेमंत विभुते, दीपक गायकवाड, स्वप्नील बोडके, यांच्यासह शहापूर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक आर. केंद्रे, कमलाकर मुंडे, पो. हवालदार शशिकांत पाटील, विकास सानप, दत्ता भोईर, अनिल राठोड, रमेश नलावडे यांनी शिताफीने नागोबा हत्याकांड उघडकीस आणले. कल्याणचा सुप्रसिद्ध सर्पमित्र गणेश बाजीराव खंडागळे आणि रमेश मोरेचे साथीदार सोमनाथ जाधव (रा. टावरीपाडा कल्याण) आणि नारायण तुकाराम भोईर (रा. भुवनगाव, मुरबाड) आणि जयेश भास्कर फर्डे (रा. धसई, ता.शहापूर) यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी रमेश मोरे अद्यापही फरार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या