दिल्ली युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा खून
दिल्ली, 19 जून : दिल्ली विद्यापीठातील आर्य भट्ट कॉलेजचा विद्यार्थी निखील चौहान याच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी 19 वर्षांचा असून त्याचं नाव राहुल असल्याचं समोर आलं आहे. तो बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे. तर दुसरा आरोपी हारुन हा जनकपुरीत राहतो. राहुल आणि हारुन दोघे मित्र आहेत. या दोघांशिवाय इतर दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी चरक पालिकेच्या रुग्णालयातून एक पीसीआर कॉल आला होता. रुग्णालयात एका जखमी विद्यार्थ्याला आणले असल्याचं सांगितलं होतं. त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. मात्र विद्यार्थ्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तो पश्चिम विहार इथं राहत होता अशी माहिती समजते. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव निखिल चौहान असं आहे. Nagpur News : गाडी घेऊन गेल्याचा राग, झोपेतच बापानं मुलाला संपवलं; नागपुरात खळबळ निखिल बीएमध्ये पॉलिटिकल सायन्स स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होती. सात दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने निखिलच्या मैत्रिणीची छेड काढली होती. त्यातून वाद झाला होता आणि याच वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. पोलिसांनी सांगितले की, रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आरोपी तीन साथीदारांसोबत कॉलेजच्या गेटवर निखिलला भेटला. त्यावेळी निखिलच्या छातीवर त्याने चाकूने वार केले. यात जखमी झालेल्या निखिलला चरक पालिका रुग्णालयात आणण्यात आले. पण उपचार करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू आहे.