पुणे, 25 जुलै : सध्या अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसत आहेत. यात तरुणाईचे प्रमाण लक्षणीय असलेल्याचे दिसते. मात्र, शेअर बाजाराच्या या बेभरवशी प्रकाराचा एका नवदाम्पत्याला चांगलाच फटका बसला आहे. पुण्यातून ही घटना समोर आली आहे. एका ब्रोकरने नवविवाहित दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार घडला. काय आहे नेमकं प्रकरण - पुण्यातील एका नवविवाहित दाम्पत्याने चांगल्या ओळखीतल्या माणसाच्या मदतीने शेअर बाजारात पाच लाख रुपये गुंतवले. यानंतर या दाम्पत्याला महिन्याला 10 ते 12 हजार रुपये देण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आले होते. यात ब्रोकिंग एजंट एक महिला होती. तसेच ती या नवविवाहितेच्या माहेरच्याच गावाची होती. त्यामुळे त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. त्यांना कंपनीतून कन्फर्मेशनचा जेव्हा जेव्हा फोन येईल तेव्हा तेव्हा फक्त हो म्हणण्यास सांगितले होते. म्हणजे जेव्हा ती ब्रोकर एजंट कोणतेही शेअर विकत घेईल किंवा विकेल तेव्हा कंपनी मूळ पैसे गुंतविणाऱ्यांना फोन करून विचारेल, तेव्हा त्यांनी हो म्हणत त्या ट्रान्झेक्शनला संमती द्यायची. याचप्रकारे अनेक महिने निघून गेले. ट्रान्झेक्शन होत गेली. सुरुवातीला त्यांना फायदा झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, तोटा झालेली ट्रान्झेक्शन दाखविण्यात आले नाहीत. मात्र, हे दाम्पत्या दोन-चार महिन्यांनी ऑफिसमध्ये गेले. यावेळी त्यांच्या खात्यावर फक्त 50 हजार रुपये उरल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या तरुणीने तेदेखील संपवले आणि खात्यात शून्य रुपये उरले. हा अधिकृत घोटाळा नेमका कसा होतो - ब्रोकिंग फर्म या नागरिकांनी गुंतविलेल्या पैशांवरील कमिशनवर जगतात. तेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. त्या ब्रोकिंग एजंटला त्याने जेवढे पैसे गुंतविले किंवा शेअर विकून काढून घेतले की त्याचे कमिशन मिळते. आता भारतीय रुपयात ट्रेडिंग केले तर कमी कमिशन आणि डॉलरमध्ये शेअर घेतले तर जास्त, असे स्वरुप आहे. मग नवीन गुंतवणूकदार असो की जुना, गरीब श्रीमंत कुणीही असो तो एकावेळी हजार शेअर घेत नाही. तर पन्नास, तीस, वीस असे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर घेतो आणि तोटा झालाच तर सावध राहिल्याने कमी होईल आणि फायदा झाला तरी तो काहीसाच त्याला समाधान देणारा असा असतो. म्हणून ही शेअर ब्रोकिंग एजंट तरुणी चतुर होती. तिने कमिशन जास्त कमावण्यासाठी डॉलरमध्ये हजारा हजाराच्या संख्येने शेअर घेतले. मात्र, दुसरीकडे शेअर बाजार पडल्याने नवविवाहित दाम्पत्याचे पैसे बुडाले. त्यांनी काही जवळच्या मित्रांना तिथेच पैसे गुंतविण्यास सांगितले. तर त्यांचेही बुडाले होते. हेही वाचा - हॉटेल नावावर न केल्याने मुलगा नाराज, आई-वडिलांसोबत केलं धक्कादायक कृत्य यानंतर या जोडप्याने त्या ब्रोकिंग फर्मच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता त्याने सांगितले की, आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्हाला जेव्हा जेव्हा कन्फर्मेशन कॉल आला तेव्हा तेव्हा तुम्ही हो म्हणालात आणि आम्ही ट्रान्झेक्शन केले. यामुळे तुम्ही कुठेही तक्रार केली तरी काहीही फायदा होणार नाही. अधिकृतरित्या या दाम्पत्याची फसवणूक झाली. मात्र, तरीसुद्धा त्याची पोलिसांत नोंद होऊ शकली नाही. अशाप्रकारे या दाम्पत्याला शेअर बाजारात फसवणूक होऊन लाखोंचा फटका बसला आहे.