पतीला तुरुंगात पाहताच गरोदर महिलेनं तिथेच सोडला जीव
पाटणा 07 जून : हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीला भेटण्यासाठी गेलेली पत्नी पतीचा चेहरा पाहताच बेशुद्ध पडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही महिला 8 महिन्यांची गर्भवती होती आणि 27 जून रोजी तिची प्रसूती होणार होती. वहिनीच्या मृत्यूसाठी दिराने पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. ही घटना बिहारमधील भागलपूर येथील विशेष मध्यवर्ती कारागृहातील आहे. भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात 6 जून रोजी अंगावर काटा आणणारी ही घटना घडली होती. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत 2 वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि सध्या पल्लवी 8 महिन्यांची गरोदर होती. Crime News: लग्नानंतर 10 दिवसातच नवरीने दिला बाळाला जन्म; भडकलेल्या पतीने केलं ‘हे’ काम गुड्डू यादव याचा विनोद यादव याच्याशी जमिनीबाबत वाद होता. या प्रकरणी गुड्डूवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. 6 जून रोजी पल्लवी पती गुड्डूला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली. नंबर येताच गुड्डू तिच्या समोर आला मात्र इतक्यात पल्लवी बेशुद्ध पडली. यानंतर तिला घाईगडबडीत मायागंज रुग्णालयात आणण्यात आलं. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पल्लवीच्या मृत्यूसोबतच तिच्या पोटात वाढणारं मूलही या जगात राहिलं नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी आठ महिन्यांची गर्भवती होती. डॉक्टरांनी 27 जून ही प्रसूतीची तारीखही दिली होती. पण, त्यापूर्वीच ही घटना घडली. गुड्डूचा भाऊ विक्की यादव सांगतो की, ‘पोलिसांच्या मनमानीमुळे पल्लवीला आपला जीव गमवावा लागला आहे. दुसऱ्या पक्षाकडून (विनोद यादव) पैसे घेऊन पोलिसांनी माझा भाऊ गुड्डू याला तुरुंगात पाठवलं. भाऊ तुरुंगात गेला नसता, तर कदाचित ही परिस्थिती आली नसती, आज आमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं. याला फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे.’ पल्लवीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शवविच्छेदनासाठी सहमत नव्हते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पल्लवीचा पती अंत्यसंस्कारासाठी पोलीस संरक्षणात स्मशानभूमीत पोहोचला होता.