JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / पैशांच्या मोहापायी फासला मैत्रीला काळिमा; विम्याची रक्कम मिळवण्यासाठी केलं भयानक कांड

पैशांच्या मोहापायी फासला मैत्रीला काळिमा; विम्याची रक्कम मिळवण्यासाठी केलं भयानक कांड

पैशांच्या मोहापायी एका व्यक्तीने धक्कादायक कृत्य केलं.

जाहिरात

अटक करण्यात आलेले आरोपी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फतेहगढ साहिब, 29 जून : आपल्या जीवलग मित्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी व्यक्ती काहीही करू शकते, असं म्हटलं जातं. त्यामुळेच मैत्रीच्या नात्याला फार महत्त्व दिलं जातं. पंजाबमधील सुखजितसिंग नावाच्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र एकदम उलटं घडलं आहे. पैशांच्या मोहापायी सुखजितसिंगच्या मित्रानं त्याचा जीव घेतला. सुखजितची पत्नी जीवनदीप कौर हिने सुखजित बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा खून झाल्याची बाब उघडकीस आली. ‘आज तक’ नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक रवज्योत कौर ग्रेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहगढ साहिब येथील रामदासनगर भागात राहणारा गुरप्रितसिंग, त्याची पत्नी खुशदीप कौर आणि इतर चार जणांना सुखजितसिंग नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. व्यावसायिक असलेल्या गुरप्रीतनं आपली पत्नी आणि इतर चार जणांच्या मदतीनं अगोदर सुखजितचा खून केला. नंतर, तो मृतदेह आपला असल्याचं भासवून अपघाती विम्याचे 4 कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडवून आणण्यापूर्वी गुरप्रीतनं आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला होता. सुखजितची शरीरयष्टी गुरप्रीतसारखीच होती. त्यामुळे गुरप्रीतनं सुखजितशी मैत्री केली. त्याला अनेक दिवस दारू पाजली आणि पैसेही दिले. घटनेच्या दिवशीही गुरप्रीतनं मयत सुखजीतला दारूमध्ये औषध मिसळून पाजलं होतं. यानंतर बेशुद्धावस्थेत त्याला राजपुरा येथे नेऊन ट्रकने चिरडलं. त्याच्या हत्येनंतर गुरप्रीतनं आपल्या कुटुंबियांकरवी स्वत:च्या अपघाताची केस दाखल केली. या दरम्यान, सानीपूरमध्ये राहणाऱ्या जीवनदीप कौरनं आपला पती सुखजितसिंग 19 जून रोजी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. अशी तक्रार सरहिंद पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता पटियाला रोडवरील कालव्याच्या काठावर सुखजितची दुचाकी आणि चप्पल आढळली. एक किलोमीटर अंतरावर सुखजितचा मोबाईल जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद वाटल्यानं त्यांनी कसून तपास सुरू केला. यादरम्यान पोलिसांना सुखजीतचा मित्र गुरप्रीत याची माहिती मिळाली. हेही वाचा -  लग्नात रुग्णवाहिकेत पोहोचला वर, स्ट्रेचर वरुन बसून वधूला घातला हार, VIDEO सुखजितची सानीपूर येथे राहणाऱ्या गुरप्रितसिंगशी काही दिवसांपासून मैत्री होती. गुरप्रीत सुखजीतला स्वतःच्या पैशाने दारू पाजत असे. 19 जून रोजी गुरप्रितसिंग, त्याची पत्नी खुशदीप कौर, मित्र सुखविंदरसिंग संघा एकत्र दिसले होते. आणखी तपास केला असता असं निदर्शनास आलं की, 20 जून रोजी राजपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुरप्रितसिंगचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मृत्यूची नोंद झालेला गुरप्रीत आढळला जिवंत - काही दिवसांपूर्वी राजपुरा पोलिसांना छिन्न-विछिन्न एक मृतदेह सापडला होता. गुरप्रितसिंगच्या पत्नीनं हाच आपला पती असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांनी अपघाताची नोंद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गुरप्रीतच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर त्यावर अंत्यसंस्कारही केले. जेव्हा सुखजितच्या केस संदर्भात तपास करत असताना सरहिंद पोलिसांना गुरप्रितसिंग जिवंत सापडल्यानंतर प्रकरणाला वेगळ वळण मिळालं. त्यानंतर फतेहगढ साहिब जिल्हा पोलीस दलानं ह्युमन इंटिलिजन्स, तांत्रिक साधनं आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं तपास पुढे नेला. गुरप्रितसिंग हा घाऊक व्यापारी असल्याचे समोर आलं. त्याला व्यवसायात मोठा तोटा झाला होता. यामुळे त्यानं काही महिन्यांपासून विम्याची रक्कम मिळवण्यासाठी प्लॅन करण्यास सुरुवात केली होती. मृत्यू प्रमाणपत्र आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे विम्याची संपूर्ण रक्कम वारसांना मिळेल, याची कल्पना गुरप्रीतला होती. गुरप्रीतनं आपला मित्र आणि या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड सुखविंदरसिंग संघा याच्या मदतीनं आपल्या सारखीच शरीरयष्टी असणाऱ्या सुखजित सिंगच्या हत्येचा कट रचला. गुरप्रितसिंगनं सुखजितच्या अगोदर आणखी दोघांची निवड केली होती. मात्र, काही कारणास्तव त्यानं आपला प्लॅन यशस्वी करण्यासाठी सुखजीतचीच निवड केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरप्रितसिंग, त्याची पत्नी खुशदीप कौर, सुखविंदरसिंग संघा, जसपाल सिंग, दिनेश कुमार आणि राजेश कुमार यांना अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या