आईनेच पोटच्या बाळाला विकलं (प्रतिकात्मक फोटो)
कोलकाता 28 जुलै : एका जोडप्याने आपलं बाळ विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाला विकण्यामागील कारण तर त्यापेक्षाही हादरवून टाकणारं आहे. रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून या जोडप्याने आपलं 8 महिन्यांचं बाळ विकलं आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुलाच्या आईला आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुलाचे वडील जयदेव यालाही अटक करण्यात आली, जो यापूर्वी फरार होता. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या शेजाऱ्यांना बाळ न दिसल्याने त्यांनी बाळ कुठे आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचं कबूल केलं. लॉकडाउन लव्हस्टोरीचा भयानक शेवट, एका हातात 9 महिन्याचं बाळ अन् दुसरा हात रक्ताने माखलेला… काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष सुरू होता आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतला. इतकंच नाही तर रील बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता. प्रियंका घोष नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगीही आहे आणि ती देखील अंमली पदार्थांचं सेवन करते. या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती. एका स्थानिक नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार, हे जोडपं त्यांच्या मुलीलाही विकणार होते. स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले, “मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. मात्र याबद्दल आम्हाला समजताच आम्ही पोलिसांना कळवलं. पोलिसांनी जयदेवला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या मुलाची गरिबीमुळे की अन्य काही कारणांमुळे विक्री केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तपास सुरू असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी विचार केला जात आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे