आमदार गीता जैन
राजा मयाल, प्रतिनिधी ठाणे, 27 जून : आमदार गीता जैन यांनी 20 जूनला पालिका अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. पेंकरपाडा भागात एका नागरीकाने घरात केलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. हे बांधकाम हा नागरिक स्वत: तोडण्यास तयार असताना पालिकेनं का कारवाई केली? असा सवाल स्थानिक आमदार गीता जैन यांनी केला होता. याचवेळी बोलताना जैन यांना राग अनावर झाल्याने त्यांनी अभियंत्याच्या कानशिलात लगावली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अभियंत्यांकडून तक्रार मागे मिरा-भाईंदर महापालिकेच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण झाल्याप्रकरणात आमदार गीता जैन यांच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी मारहाण प्रकरणी आमदार गीता जैन यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस ठाण्याला दिलेल्या पत्रात केली होती. मात्र, या घटनेनंतर अपक्ष आमदार गीता जैन यांच्याविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात तोडगा काढण्याची मागणी करणारे अभियंता शुभम पाटील यांनी गीता जैन यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. नेमकं काय घडलं? काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यावेळी एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी नियामाचे पालन केले नसून केवळ विकासकाला फायदा पोहचवण्यासाठी हे बेकायदेशीर कृत्य केले असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता. याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या होत्या. वाचा - …तर आमदार उद्धव ठाकरेंना सोडूनच गेले नसते; आठवलेंनी स्पष्टच सांगितलं यावेळी व्हिडीओत गीता जैन अधिकाऱ्यांना म्हणत आहेत, “तुम्ही काय बोलले याच्याशी मला देणेघेणे नाही. तुम्ही घरमालकांना लेखी स्वरुपात काय दिलं ते मला दाखवा. मी सभागृहात याबाबत प्रश्न विचारणार आहे. पावसाळ्यात कुणाचंही घर तोडायचं नाही असा सरकारचा जीआर असताना आमचे दोन इंजीनियर जाऊन घरं तोडतात. लहान मुलांना खेचून घराबाहेर फेकतात.”