फाईल फोटो
लखनऊ, 13 एप्रिल : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजचा माफिया डॉन आणि माजी खासदार अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा गुरुवारी यूपी पोलिसांच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. झाशीतील या चकमकीत असदसोबत आणखी एक कुख्यात शूटर गुलामही मारला गेला. हे दोघेही उमेश पाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी असून घटनेनंतर ते फरार होते. या दोन आरोपींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लखनऊमध्ये मोठी बैठक घेतली. यूपीच्या सीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला होता’.
उमेश पाल हत्याकांडावर उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी यांनी विधान केले होते. या माफियांना गाडून टाकणार असे विधान त्यांनी केले होते. अशा परिस्थितीत या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या एन्काउंटरनंतर त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असून भाजपचे अनेक नेते त्याचा उल्लेख करत आहेत. यूपी सरकारचे मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी ट्विट केले, ‘मिट्टी में मिला दिया… STF टीम को बधाई!’ तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्या सभागृहातील विधानाचा संदर्भ देत, ‘इस सदन में कह रहा हूं इस माफिया को मिट्टी में मिला देंगे – योगी आदित्यनाथ जी… कह दिया तो कह दिया,’ असे ट्विट त्यांनी केले. तत्पूर्वी, यूपी एसटीएफच्या वतीने ही माहिती देताना सांगण्यात आले की, अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनचा मुलगा गुलाम हे प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात मोस्ट वॉन्टेड होते. तसेच दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. पोलीसही त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेत्तृत्वाखाली यूपीएसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत दोघेही मारले गेले. त्यांच्याकडून परदेशात बनवलेली अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यूपी एसटीएफ प्रमुख अमिताभ यश यांनी झाशीमध्ये असद अहमदच्या एन्काउंटरबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘24 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये उमेश पालसह दोन पोलिसांची हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लवकरच यात सहभागी असलेल्या सर्वांची माहिती हाती लागली. यानंतर आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तयार करण्यात आली. एसटीएफनेही मारेकऱ्यांच्या शोधात आपली पूर्ण ताकद लावली होती.’ यासोबतच त्यांनी सांगितले की, आज असद आणि गुलाम यांना झांशीमध्ये माग काढण्यात आला. दोघांनाही जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी एसटीएफ टीमवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरात करण्यात आलेल्या गोळीबारात ते दोघेही ठार झाले. हे सर्व मोठे माफिया आहेत, त्यांच्याकडे लपण्यासाठी अनेक जागा आहेत. त्यांचा मागोवा घेण्यास वेळ लागला, पण आज त्यात मोठे यश मिळाले आहे. या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा आम्ही लवकरच प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.