पुणे, 03 जानेवारी : मागच्या चार दिवसांपूर्वी पुण्यात खुलेआम कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या घटनेची राज्यभर चर्चा झाली ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. 31 डिसेंबरला लोणावळ्यात कोयत्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गाडी पार्कींग करण्याच्या कारणावरून झाल्याचे समजते आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
लोणावळ्यात 31 डिसेंबरच्या रात्री गाडी पार्किंगला का लावली असं म्हणत पर्यटकांशी हुज्जत घालण्यात आली. दरम्यान हे प्रकरण वाढल्याने कोयत्याने वार करत मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान याबाबत लोणावळा शहर पोलीसांनी स्थानिक गावगुंड रोहन गायकवाड, इम्मू शेख सह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत नवी मुंबईतील पर्यटक निरजकुमार तिवारी,आणि हर्ष गुप्ता हे जखमी झाले आहेत.
हे ही वाचा : चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार…पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा
निरजकुमार तिवारी आणि त्यांचे चार मित्र नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात आले होते. 31 डिसेंबरच्या रात्री 1 वाजता भूक लागली म्हणून ते मॅगी पॉईंटवर आपल्या वाहनांनी आले एका दुकानासमोर समोर वाहन लावले. त्यावेळी तिथे उभे असलेल्या स्थानिक तरुणांनी या ठिकाणी वाहन का उभे केले, म्हणून हुज्जत घालण्यात सुरुवात केली. काही वेळाने या हुज्जतीच रूपांतर मारामारी पर्यंत आले आणि वाद वाढला आरोपींनी निरजकुमार आणि त्याचे मित्र हर्ष यांना हाताने, कुंडीने आणि कोयत्याने गंभीर मारहाण करत वाहनांची तोडफोड केली.
हे ही वाचा : VIDEO पुण्यातील कोयता गँगचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; पोलिसांनी सांगितला तो अनुभव
घटनास्थळी लोणावळा शहर पोलीसांचे गस्ती पथक आल्यावर मारहाण करणारे आरोपी फरार झाले, पोलीसांनी जखमींना खासगी रुग्णालयात हलविले असून आरोपीचा शोध घेत आहे.
तीन दिवसांपूर्वींचा पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता जोडीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. यातील एकाला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन चांगलाच चोप दिला होता. तर दुसरा त्यावेळी फरार झाला होता. या आरोपीच्या पुणे पोलिसांनी थेट बीडमधून मुसक्या आवळल्या.
या गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी आणि भविष्यात कोणीही असं कृत्य करण्याची हिंमत करू नये, म्हणून पुणे पोलिसांनी आज एकाची सिंहगड रोड परिसरातून धिंड काढली. यावेळी परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.