नवी दिल्ली, 2 जून : दक्षिण दिल्लीमध्ये पोलिसांनी किडनी रॅकेटचा (Kidney Racket) पर्दाफाश केला असून दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडमधल्या 10 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्लीतल्या डॉक्टरचा समावेश असून तो एका बड्या खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करतो. त्याच्यासोबत एमबीबीएसचं (MBBS) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, 2 -3 लाख रुपयांत गरिबांची किडनी खरेदी करून 20-30 लाखांत त्यांची विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी विक्रीचं रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवलं जात होतं. सोशल मीडियावर किडनी आणि ऑर्गन डोनर्सच्या (Organ Donor) नावाने वेगवेगळी पेजेस बनवण्यात आली होती. त्या पेजवर संपर्क साधणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यानंतर त्यांना विविध प्रकारची आमिषं दाखवून किडनी दान करण्यासाठी तयार केलं जात होतं. दिल्लीतील हौज खास परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या किडनी प्रत्यारोपण रॅकेटबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी या रॅकेटचे सूत्रधार कोण असू शकतात आणि गरीब, गरजूंना कशा प्रकारे फसवलं जातं याची पूर्ण माहिती काढली व त्याचा पर्दाफाश केला. सोशल मीडियावर शोधायचे सावज, सोनीपतमध्ये ऑपरेशन अवैधरीत्या सुरू असलेला हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. एखादी गरिब, गरजू व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर भामट्यांची टोळी त्यांना पैशांचं आमिष दाखवत असे. एकदा का सावज जाळ्यात अडकलं, की किडनी दान करणाऱ्यांना हरियाणात सोनीपतला नेलं जात होतं. किडनी दान करणारा तेथे पोहोचेपर्यंत आरोपींकडून ऑपरेशन थिएटर तयार ठेवले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी दान करणाऱ्यांना केवळ 2 ते 3 लाख रुपये दिले जात होते. तिच किडनी विक्री करताना मात्र 20 ते 30 लाख उकळले जात होते. किडनी विकून आलेल्या पैशांची व्हायची सर्वांमध्ये वाटणी दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्त बेनिता मेरी जयकर म्हणाल्या, की 26 मे रोजी हौज खास या परिसरात अवैधरीत्या किडनीचा व्यवहार केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. येथे 2 लॅबमध्ये किडनी दान करणाऱ्यांची तपासणी केली जात होती. गरीब, गरजूंना तेथे नेऊन ही तपासणी सुरू असायची. या प्रकरणाची चौकशी करताना आम्हाला पिंटू नावाची व्यक्ती तेथे सापडली. पिंटूची अवैधरीत्या तपासणी करण्यात आली होती. यानंतर या रॅकेटमधल्या 2 एजंट्सची माहिती मिळाली. किडनी दान करणाऱ्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना सोनीपत येथे नेलं जात होतं व ऑपरेशन केलं जायचं. 20 ते 30 लाखांत किडनी विकून आलेले पैसे सर्वांमध्ये वाटले जायचे. या प्रकरणात डॉ. सौरभ मित्तल आणि मुख्य आरोपी कुलदीप राय यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतल्या आरोपींची नावं पोलिस उपायुक्त बेनिता मेरी जयकर यांनी अटकेतल्या आरोपींबाबत माहिती दिली. यात कुलदीप रे विश्वकर्मा ऊर्फ केडी (वय 46), सर्वजित जैलवाल (37), शैलेश पटेल (23), मोहम्मद लतीफ (24), बिकास उर्फ विकास (24), रंजीत गुप्ता (43), डॉ. सोनू रोहिल्ला (37), डॉ. सौरभ मित्तल (37), ओम प्रकाश शर्मा (48) आणि मनोज तिवारी (36) यांचा समावेश आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कुलदीप रे ऊर्फ केडी आहे. सर्वजित आणि शैलेश हे पैशांच्या मोबदल्यात किडनी दान करणाऱ्या व्यक्ती शोधून आणत होते. मोहम्मद लतीफ हा हौज खास परिसरातल्या लॅबमध्ये काम करत होता.