सांकेतिक छायाचित्र
राजा मयाल, प्रतिनिधी वसई, 4 जून : वसईत हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या तासांमध्ये अटक करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आलं आहे. मजुरीचे पैसे कमी दिल्याच्या रागातून मजुराने ठेकेदाराच्या भावाच्या डोक्यात लाकडी फळी घालून त्याची निर्घृण हत्या केली होती. शुक्रवारी रात्री 11च्या सुमारस ही घटना घडली होती. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. माणिकपूर पोलीस आणि क्राइम ब्रांच यांनी संयुक्त तपास करत आरोपीच्या 12 तासांच्या आत मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. काय आहे प्रकरण? मोहम्मद मोईन फारुख (वय 38) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, अरबाज (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. वसईच्या दिवनमान परिसरात कासा टेरेजा या इमारतीचे काम चालू आहे. या इमारतीचे काम करून देण्याचा ठेका मोहम्मद मोईन फारुखी यांच्या मोठ्या भावाने घेतला होता. वसईच्या साईडवर मजुरीचे काम करणारा अरबाज याची मजुरी ठेकेदाराकडे बाकी होती. ठेकेदार हा गावी गेला असल्याने मृत मोईन यांच्याकडे त्याच्या मोठ्या भावाने 10 हजार रुपये अरबाजला देण्यासाठी दिले होते. मात्र, मोईन याने 10 हजार न देता 8 हजार दिले होते. दोन हजार देत नसल्याने मयत आणि आरोपीमध्ये रात्री वाद झाला. याच वादातून आरोपीने लाकडी फळी मयताच्या डोक्यात घातली. यात मोईन हा जागीच गतप्राण झाला. तर हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना झाल्या होत्या. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीला लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबईच्या कुर्ला येथून अटक करण्यात यश मिळवलं आहे. वाचा - हातावर त्रिशूल अन् ओमच्या टॅटूने फुटलं पतीचं बिंग; भावाच्या मदतीने पत्नीसोबत.. सराईताकडून भगताची हत्या विरार पूर्वेकडील मांडवी पोलीस हद्दीत एका 75 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून मारेकऱ्याचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिरसाड येथे आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले. सदर आरोपी हा उसगाव येथेच राहणारा आहे. विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत (वय 35) असे त्याचे नाव असून बायको नांदावी यासाठी त्याने भगत असलेल्या भिवाला जागरण करण्यासाठी दोन हजार रुपये दिले होते. मात्र, जागरणाचा काहीही फायदा न झाल्याने मनात राग धरलेल्या विनोदने भिवाला बोलावून दारू पाजली. त्यानंतर बाचाबाची करून भिवाला उसंगाव येथील देसाई वाडी बस स्टँडजवळ नेऊन त्याची सिमेंटच्या दगडाने ठेचून हत्या केली.