भोपाळ, 20 एप्रिल : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) जिल्ह्यातून एक संतापजनक आणि वाईट बातमी समोर येत आहे. एका तरुणाने जादूटोणाच्या (black magic) संशयावरुन आपल्या 71 वर्षीय आजोबांची निर्घृणपणे हत्या (murder) केली आहे. वृद्धाच्या आत्महत्येनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. रात्रीच्या अंधारात वृद्धावर तलवारीने (sword) वार करुन त्यांना कोण जीवे मारेल? या विचाराने गावकरी त्रस्त होते. तसेच पोलीसही या हत्येचा तपास करण्यात गुंतले होते. या दरम्यान पोलिसांना हत्येचा उलगडा करण्यात यश आलं आहे. या वृद्धाच्या नातेवानेच त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने हत्या करण्यामागील कारणंही विचित्रच आहे. संबंधित घटना ही जबलपूरच्या माढोताल परिसरात घडली आहे. मारेकरी नातवाचं संदीप अहिरवार असं नाव आहे. तर मृतक आजोबांचं नेतराम अहिरवार असं नाव होतं. अहिरवार यांची सोमवारी (18 एप्रिल) रात्री बारा वाजेच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. नातू संदीपचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण त्यांच्या घरात पाळणा हलत नव्हता. आपल्याला मुल होत नाही यामागे आपले आजोबाचं जबाबदार आहेत, असं आरोपीचं मत होतं. आजोबांनी जादूटोणा केल्यामुळे घारण्याला वंशाचा दिवा मिळत नाही, असा त्याचा भ्रम होता. याच विचारातून त्याने आपल्या आजोबांची निर्घृणपणे हत्या केली. ( Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला, 44 अशांवर पोहोचलं तापमान; तर ‘या’ जिल्ह्यांत पावसाची स्थिती ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नेतराम हे शेतकरी होते. ते शेतीचे काम करायचे. त्यांच्या घराच्याजवळ एक जिल्हा परिषद शाळा होती. त्या शाळेबाहेर गावातील काही शेतकरी आपला शेतीचा माल, धान्य ठेवायचे. नेतराम यांनीदेखील आपला शेतमाल तिथे ठेवला होता. रात्री जेवण केल्यानंतर नेतराम दररोज तिथे आपल्या धान्याची देखभाल करण्यासाठी जायचे. नेतराम सोमवारी सु्द्धा रात्री अकरा वाजेच्या सुमारास शाळेसमोर आपल्या धान्याच्या देखभालसाठी निघाले होते. पण नंतर ते घरी परतलेच नाही. तासाभरानंतर गावात मोठी खळबळ उडाली. कारण नेतराम यांच्या अंगावर अनेक वार करुन त्यांना रक्तबंबाळ करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. या हल्ल्यात नेतराम यांचा जागीच मृत्यू झाल्याची देखील चर्चा सुरु झाली. आणि तिच चर्चा खरी ठरली. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनी नेतराम यांचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. इकडे गावात नेतराम यांच्या हल्ल्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. नेतराम यांची हत्या चोरांनी केली की दरोडेखोरांनी केली? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या दरम्यान पोलिसांना नेतराम यांचा नातू संदीपच्या हालचाली काहीशा संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पण तरीही तो कबलेना. अखेर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो भळाभळा बोलायला लागला. त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी संदीप अहिरवारने गुन्हा का आणि कसा केला याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. त्याला आपल्या आजोबांवर जादूटोणा करत असल्याचा संशय होता. “माझ्या दोन्ही भावांचं लग्न झालं आहे. पण दोघांना मुलं झालेले नाहीत. चार वर्षांपूर्वी माझ्या भावजयीचा गर्भपात झाला होता. त्यानंतर माझ्या भावाचा मृत्यू झाला होता. या सगळ्यांमागे आजोबांचा हात आहे, असं मला सारखं वाटत असायचं. कारण आजोबा जादूटोणा करायचे, असं वाटत होतं. त्यामुळे सोमवारी रात्री मी त्यांची हत्या केली. हत्येनंतर एक तासांनी गावातील एका व्यक्तीने त्यांचा मृतदेह बघितला. त्यानंतर संपूर्ण गावात हत्येची बातमी पसरली. मी ज्या तलवारीने हत्या केली ती तलवार शेतात लपवली”, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली. पोलिसांनी आरोपीची तलवार शेतातून जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.