प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 13 जून : सासरच्या लोकांकडून सुनेचा छळ किंवा नवऱ्याकडून बायकोला त्रास अशा बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. मात्र, सांताक्रूझ येथे घडलेली घटना बापलेकीच्या नात्यावर डाग असल्याचा विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. वडील फ्लॅट विकून लंडनला स्थायिक होण्यासाठी पैसे देत नसल्याने मुलीने त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं समोर आलं आहे. मारहाण करण्याबरोबर कोंडून ठेवणे, जेवण न देणे असा त्रास असह्य झाल्याने 81 वर्षीय वृद्धाने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तेव्हापासून हॉटेलमध्ये राहणाऱ्या बापाला आता मुलगी पुन्हा घरात घेत नसल्याने तिच्याविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा - वडिलांनी बळजबरीने लावलं लेकीचं दुसरं लग्न; तरुणीनं नवऱ्याला राखी बांधून विषयच संपवला, प्रकरण काय? काय आहे प्रकरण? सांताक्रूझ पश्चिमेला एका गृहनिर्माण सोयायटीमध्ये वसंतभाई हे वृद्ध वास्तव्यास आहेत. 2005 मध्ये त्यांच्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले. तेव्हापासून मुलगी आणि मुलाचा त्यांनी सांभाळ केला. बहिणीसोबत पटत नसल्याने त्यांचा मुलगा पत्नीसोबत स्वतंत्र राहू लागला. वसंतभाई हे मुलीसोबत राहत होते. त्यांनी मुलीला चांगलं शिक्षण देऊन फॅशन डिझायनर बनविले. अविवाहित असलेली मुलगी अधूनमधून लंडनमध्ये जाऊन राहायची. मार्चमध्ये ती मुंबईत परतल्यापासून कोणतही काम न करता केवळ वसंतभाई यांच्या पैशावर मजा मारू लागली. तिला लंडनला स्थायिक व्हायची इच्छा असल्याने वडिलांना राहता फ्लॅट विकण्यास सांगितले. वसंतभाई याला नकार दिल्याने मुलीने जन्मदात्या पित्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.
वडिलांचा फोन घेतला काढून आपण करत असलेल्या कृत्याची कुठे वाच्यता करू नये यासाठी मुलीने वडिलांकडून त्यांचा फोन काढून घेतला. कोणाशीही बोलू न देणे, बेडरुममध्ये कोंडून ठेवणे, जेवण न देणे, भांडण करून मारहाण करणे, अशाप्रकारे वसंतभाई यांना त्रास दिला जात होता. एकेदिवशी वडिलांनी संधी साधून आपल्या मुलाशी संपर्क केला. नंतर भावाने पोलिसांना कळविल्यानंतर त्यांची सुटका झाली. वसंतभाई दोन दिवस जवळच्या हॉटेलमध्ये राहू लागले. दोन दिवसांनी पुन्हा घरी गेले. मात्र, त्यांना मुलीने आत घेतले नाही. पोलिसांनाही बोलावून मुलगी घरात घेत नसल्याने वसंतभाई यांच्या तक्रारीवरून तिच्याविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक व पालक पालन पोषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.