मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतात ही घटना घडली
सुनील घरत, प्रतिनिधी शहापूर, 03 मे : मुंबईजवळील शहापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचा जिलेटीन कांड्याच्या स्फोटात मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे या तरुणाच्या मृतदेहाचे 25 फुटांच्या अंतरावर तुकडे-तुकडे पडले होते. ही हत्या की अपघात होता, याबद्दल पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर इथं मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतात ही घटना घडली. कल्पेश देसले (वय 32) असं मृत तरुणाचं नाव आहे. कल्पेश देसले हा वासिंद जवळील दहागाव इथं राहत होता. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कल्पेश हा हळदीच्या कार्यक्रमाला जातो असं सांगून घरातून गेला होता. पण, सकाळपर्यंत तो घरी आलाच नाही. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही. (बनावट कागदपत्र देऊन तब्बल 13 वर्षे महिला राहिली शिक्षिका, असं फुटलं बिंग..) काही वेळानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतातील एका पत्रा शेडच्या बाहेर कल्पेश देसलेचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोट तपास यंत्रणा, श्वान पथक, एटीएस, गुन्हे अन्वेषण विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पाहणी केली असता जिलेटीनच्या कांड्याच्या स्फोटात कल्पेशचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. (सरपंच महिलेच्या पतीसह गावकऱ्यांवर गोळीबार, गावात भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं?) पण घटनास्थळी क्लेशचा मृतदेह आढळून आला तो शेडच्या बाजूला होता. त्यामुळे नेमकं काय घडलं, हा अपघात होता घातपात होता,याचा संशय पोलिसांना बळावला आहे. कल्पेशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील येथील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कल्पेशचा मृत्यू हा अपघातात नसून घातपात असल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. घटनेचा पुढील तपास क्राईम ब्रँच, बॉम्ब शोधक पथक आणि पडदा पोलीस करत आहेत.