नवी दिल्ली, 29 मे : देशाची राजधानी दिल्लीमधून (Delhi News) एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका मुलीने आपल्याच वडिलांची फसवणूक केली आणि त्यांच्या बँक अकाऊंटमधून 2 लाखांहून अधिक रुपये काढल्याची घडना उघडकीस आली आहे. ही बाब समोर आल्यानंतर दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आपले सेवा निवृत्त वडिलांची फसवणूक करीत त्यांच्या बँक खात्यातून एकाच महिन्यात दोन लाखांहून अधिक पैसे काढल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात मुलीला अटकही केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी या पीडित ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या पेन्शनच्या बँक अकाऊंटमधून दोन लाख 3 हजार रुपये काढल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांच्या टीमने कारवाई सुरू केली. तपासादरम्यान समोर आलं की, फसवणूक दुसरं कोणी नाही तर व्यक्तीच्या मुलीनेच केली आहे. जेव्हा पोलिसांनी पीडित व्यक्तीला याबाबत सांगितलं तर, त्यांनाही धक्का बसला. टेक्निकल तपासात पोलिसांना कळालं की, वडिलांच्या खात्यातून पहिला व्यवहार पेटीएम वॉलेटमधून करण्यात आला. यानंतर तेथून पैसे एक्सिस आणि यूनियन बँकेच्या दोन वेगवेगळ्या खात्यात पाठवण्यात आले. हे दोन्ही बँक खाते वयस्क व्यक्तीच्या जावई आणि मुलीच्या नावावर होते. याच्या आधारावर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत मुलीने सांगितलं की, एका महिन्यात तिने दोन लाख तीन हजार रुपये काढले होते. पैसे काढल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी हटवण्यात आला होता. बऱ्याच चौकशीनंतर मुलीने सांगितलं की, इंश्युरेन्स कंपनीत ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी तिने पैसे घेतले होते. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.