नवी दिल्ली, 15 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या (UP bulldozer action) बुलडोझर कारवाईनंतर गुजरातमध्येही (Gujarat) बुलडोझर चालला आहे. राज्यातील खंभातमध्ये रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी झालेल्या हिंसाचारातील आरोपींच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. आरोपींनी केलेले अतिक्रमण पाडण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गुजरातच्या हिम्मतनगर आणि आनंद जिल्ह्यात रामनवमीच्या दिवशी हिंसाचार झाला, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. हिंसक लोकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी काही नराधमांना ताब्यात घेऊन चौकशी केली. नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. गुजरात पोलिसांनी सांगितले की, स्थानिक मौलवी आणि इतरांनी समुदायावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हिंसाचाराचा कट रचला होता. हे वाचा - सावधान, कोरोना पुन्हा येतोय! मुंबईसह नोएडा आणि दिल्लीत वाढले रुग्ण या घटनेतील आरोपींना गुजरात बाहेरून बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ते येथे मोठा गुन्हा करणार होते. या आरोपींना पैसे देण्यात आले होते आणि पकडले गेल्यास कायदेशीर मदत दिली जाईल, असे आश्वासनही देण्यात आलं होतं. दगडांची कमतरता भासू नये म्हणून आरोपींनी स्मशानभूमीच्या आतून दगडफेक करण्याची योजना आखली होती. आरोपींनी फक्त 3 दिवसांत संपूर्ण कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. रामनवमीला मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे, हे या लोकांना माहीत होते. .
सूत्रधार मौलवी फरार, मोठा कट रचला होता पोलिसांनी सांगितले की, या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार एक मौलवी असून तो घटनेनंतर फरार झाला आहे. रजक पटेल असे या आरोपी मौलवीचे नाव आहे. हिंसाचाराच्या घटनेसाठी स्लीपर सेल मॉड्युलही राबवून मोठ्या कटाखाली हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक पथके तैनात करण्यात आली असून अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. त्यामुळे आरोपींना लवकरच पकडले जाईल.