जयपूर, 18 फेब्रुवारी : पबजी (PUBG Online Game) खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आदित्य कुमारचा 13 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याने वडिलांकडून गिफ्टमध्ये मोबाइल मागितला. मात्र पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला. यामुळे आदित्य रागावला होता. त्याच्या वागणुकीतही बदल झाला होता. बुधवारी रात्री आईच्या साडीने गळफास लावत त्याने आत्महत्या (Student Suicide) केली. अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय आदित्य सीताराम कॉलनीत राहत होता. बुधवारी त्याचे वडील विजय सिंह रात्री उठले तर आदित्यच्या खोलीचा दिवा सुरू होता. त्यांनी डोकावून पाहिलं तर आदित्य पंख्याला लटकला होता. यानंतर कुटुंबीय दार तोडून आत गेले आणि आदित्यला रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केलं. 13 फेब्रुवारी रोजी वाढदिवशी मागितला होता मोबाइल… तपास अधिकारी राजकुमार सिंह यांनी सांगितलं की, आदित्यला पब्जीचं वेड होतं. त्याच्या वडिलांनी सुरुवातील मोबाइल देण्याचं वचन दिलं होतं. मात्र वाढदिवशी मोबाइल मिळाला नसल्यानं आदित्यला वाईट वाटलं. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर आदित्य आपल्या खोलीत झोपायला गेला. रात्री उशिरा आदित्यने आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे ही वाचा- पत्नीसह सासरच्यांकडून सुरू होता अमानुष छळ; प्राध्यापकानं केला हृदयद्रावक शेवट अभ्यासात होता हुशार… आदित्यच्या वडिलांनी सांगितलं की, तो अभ्यासात हुशार होता. तो आपल्या आजोबांच्या मोबाइलवरुन ऑनलाइन क्लास अटेंड करीत होता. त्यानंतर तासनतास पब्जी खेळत असे. पब्जीवरुन त्याला अनेकदा बोलणी खावी लागत होती. याच कारणास्तव वडिलांनी त्याला मोबाइल विकत घेऊन दिला नव्हता. यामुळे नाराज आदित्यने आत्महत्या केली.