JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / कुठे तंदुरमध्ये जाळलं, तर कुठे शरिराचे केले तुकडे, देशातील 5 अंगावर शहारे आणणारे हत्याकांड

कुठे तंदुरमध्ये जाळलं, तर कुठे शरिराचे केले तुकडे, देशातील 5 अंगावर शहारे आणणारे हत्याकांड

इतरही अनेक घटना दिल्ली, मुंबई, कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये घडल्या होत्या. त्यातल्याच काही क्रूर आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनांबद्दल आपण जाणून घेऊयात

जाहिरात

इतरही अनेक घटना दिल्ली, मुंबई, कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये घडल्या होत्या. त्यातल्याच काही क्रूर आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनांबद्दल आपण जाणून घेऊयात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर : मुंबईतील श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेमुळे अवघ्या देशात एकच खळबळ उडाली आहे. पण, याआधीही देशात अशी 5 प्रकरणं घडली आहे, ज्यामुळे अवघा देश सुन्न झाला होता.

 श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला या दोघांची भेट ही मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने ते दिल्लीला पळून गेले आणि तिथेच छतरपुरमध्ये राहत होते. 18 मे रोजी लग्नावरून झालेल्या वादातून आफताबने श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि दिल्लीतील मेहरौली भागातील जंगलात ते टाकून दिले होते. अनेक दिवस श्रद्धाची कोणतीच माहिती न मिळाल्याने तिच्या वडिलांनी या प्रकरणी तिचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. गेले सहा महिने श्रद्धाच्या मृतदेहाचा आणि आरोपीचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

(सातारा : पत्नी-मुलगा मोबाईलवर असताना पतीने केला टीव्ही बंद, यानंतर घडलं भयानक)

दरम्यान, आरोपी आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून पुढील पाच दिवसांसाठी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. दिल्ली हत्याकांडाच्या पूर्वीही भारतात दुर्दैवाने अशा अनेक खूनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांबद्दल ऐकून समाजमन सुन्न झालं होतं. रमण राघव किंवा निठारीसारख्या कुख्यात सीरियल किलरबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पण अशा इतरही अनेक घटना दिल्ली, मुंबई, कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये घडल्या होत्या. त्यातल्याच काही क्रूर आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनांबद्दल आपण जाणून घेऊयात. ‘

1. बेलाराणी दत्ता खून प्रकरण (1954)

1954 च्या साली कोलकात्यात एक भयानक हत्याकांड घडलं. कोलकात्यातील कालीघाट पार्कजवळ एका सफाई कामगाराला वर्तमानपत्रात गुंडाळलेला एक कापलेला हात सापडला. त्यानंतर अशाच वृत्तपत्रांनी झाकलेले एका महिलेच्या शरीराचे तुकडे सापडले. नंतर तिचं मुंडकंही सापडलं. त्या महिलेच्या चेहऱ्याची अवस्था इतकी वाईट झाली होती, की त्यावरून पीडितेचा चेहरा ओळखणंही कठीण झालं होतं. आरोपीने तिचे कान आणि डोळे बाहेर काढले होते, तिच्या त्वचेची सालपटं काढली होती. या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी मृत महिलेच्या चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या मुंडक्यावरून तिचा चेहरा बनवण्यासाठी एक प्लॅस्टिक सर्जन शोधला.

(हेही वाचा -  गळफास लागून मृत्यू, पोस्टमॉर्टमनंतर समोर आलं कांड, बीडच्या घटनेने खळबळ )

त्यानंतर त्या सर्जनने सांगितल्याप्रमाणे तिच्या चेहऱ्याचे स्केच काढले गेले आणि नंतर ओळख पटवण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये छापले. पण त्या महिलेबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही. एके दिवशी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रमुख समरेंद्र नाथ घोष यांना एका फार्मसीच्या कर्मचाऱ्याने त्याचा मालक एका महिन्यापासून बेपत्ता झाल्याचं सांगितलं. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला आणि आरोपीचा शोध लागला. आरोपीचं नाव बिरेन दत्ता होतं आणि त्यानेच इतक्या क्रूर पद्धतीने त्याच्या पत्नीची हत्या केली होती.

आरोपी बिरेन दत्ता हा बेलाराणी आणि मीरा नावाच्या दोन महिलांशी लग्न करून दुहेरी जीवन जगत होता. जेव्हा बेलाराणीने ती गरोदर असल्याचं सांगितलं, तेव्हा बिरेनने तिचा आणि गर्भातील मुलाचा निर्घृण खून केला, नंतर क्रूरपणे तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि शहरात फेकले. कोलकात्यात वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेलेल ते अवयव बेलराणीचे होते. या प्रकरणी आरोपी बिरेनला फाशी देण्यात आली होती.

2. तंदूर मर्डर (1995)

सुशील शर्मा आणि त्यांची पत्नी नयना साहनी हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. सुशील शर्मा दिल्लीत आमदारही राहिले होते. एकेदिवशी काँग्रेसमधील मतलूब करीम हे आपले बालपणीचे मित्र असल्याचं नयनाने सुशीलला सांगितलं. त्यामुळे सुशीलला ईर्ष्या वाटू लागली. 2 जुलै 1995 च्या रात्री नयना मतलूबशी फोनवर बोलताना आढळली अन् संतापलेल्या सुशीलने तिला गोळी झाडून संपवलं. नंतर सुशीलने बायकोचा मृतदेह बैग्या नावाच्या रेस्टॉरंटमध्ये नेला. प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या योजनेत रेस्टॉरंटचा मॅनेजर केशव शर्मा त्याच्यासोबत होता.

(पत्नीचा राग काढण्यासाठी पोटच्या मुलीचा घेतला जीव, आत्महत्येचा बनाव रचत केलं भयानक कांड)

केशव आणि सुशील यांनी तिचा मृतदेह तंदूरच्या भट्टीत जाळण्याचा प्रयत्न केला. यावरून या हत्याकांडाला ‘तंदूर मर्डर’ म्हटलं गेलं. प्रकरणाचा उलगडा झाला आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली. नयनाच्या मृतदेहाचं दोन वेळा पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. पहिल्या रिपोर्टमध्ये जळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. तर, दुसऱ्या रिपोर्टमध्ये मृतदेहाच्या डोक्यात आणि मानेला गोळ्यांमुळे छिद्र पडल्याचं लक्षात आलं. त्यामुळे तिच्यावर गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तिचा पती सुशील शर्माला अटक केली, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची फाशीची शिक्षा नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली आणि 2018 मध्ये सुशील शर्मा 29 वर्षांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आला. या प्रकरणात सुशीलचा सहआरोपी मॅनेजर केशव शर्मालाही सात वर्षे कारावासाची शिक्षा देण्यात आली होती.

3. हेतल पारेख मर्डर (1990)

कोलकात्यातील हेतल पारेख या 15 वर्षीय शाळकरी मुलीवर तिच्याच घरात बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकेदिवशी दुपारी तिची आई मंदिरात गेली असता सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड धनंजय चॅटर्जीने हे कृत्य केलं होतं. या घटनेचे पश्मिम बंगालमध्ये खूप पडसाद उमटले होते. राज्यातील राजकारणी आणि लोकांकडून या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध झाला. कायद्याने धनंजयला दोषी ठरवलं आणि त्याची तुरुंगात रवानगी झाली होती. त्याने तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला होता. अखेर 2004 मध्ये त्याला कोलकात्याच्या अलीपूर तुरुंगात फाशी देण्यात आली होती. 21 व्या शतकात कायदेशीररित्या फाशी देण्यात आलेला धनंजय हा पहिला आरोपी ठरला होता.

4. गीता आणि संजय चोप्रा अपहरण प्रकरण (1978)

कुलजितसिंग (रंगा) आणि जसबीरसिंग (बिल्ला) या आरोपींची मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर या दोघांनी दिल्लीत अपहरणाचे रॅकेट सुरू करण्याची योजना आखली. याची सुरुवात म्हणून त्यांनी 16 वर्षीय गीता चोप्रा आणि तिचा 10 वर्षांचा भाऊ संजय यांचं अपहरण केलं. दोघंही भारतीय नौदलातील एका कॅप्टनची मुलं होती आणि त्यांना त्यांचे वडील आकाशवाणीवरील कार्यक्रमासाठी नेत होते.

गीता व संजयने रंगा आणि बिल्लाशी लढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. गीताने बिल्लाला इतकं जखमी केलं होतं की या घटनेनंतर त्याला टाके पडले होते.

(नवी मुंबई हादरली, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू)

आरोपींनी खंडणीसाठी या भावंडांचं अपहरण केलं होतं, परंतु त्यांचे वडील कदाचित इतके श्रीमंत नसतील हे लक्षात आल्यावर त्यांनी खंडणी मागण्याऐवजी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला. आरोपींनी आधी संजयला मारलं, नंतर गीताचा खून केला. गीताला मारण्यापूर्वी तिचं लैंगिक शोषण झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला होता. संजय आणि गीताच्या वडिलांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला, त्यानंतर बिल्ला आणि रंगाच्या वाहनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. पुढे प्रकरणावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना 1982 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. इंडियन काउन्सिल फॉर चाईल्ड वेल्फेअरने 16 वर्षांखालील मुलांसाठी दोन वार्षिक शौर्य पुरस्कारांची स्थापना करून गीता आणि संजय चोप्रा यांचा मरणोत्तर सम्मान केला. 1978 पासून राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासोबत दरवर्षी संजय चोप्रा पुरस्कार आणि गीता चोप्रा पुरस्कार दिले जातात.

5. नीरज ग्रोव्हर मर्डर केस (2008)

टीव्ही निर्माता नीरज ग्रोव्हर हा अभिनेता शाहरुख खानने होस्ट केलेल्या ‘क्या आप पाँचवी पास से तेज है’ आणि ‘महाभारत’ सारख्या कार्यक्रमांशी संबंधित होता. एका टीव्ही ऑडिशनच्या माध्यमातून त्याची भेट कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराजशी झाली. मारिया विवाहित होती आणि तिचा पती लेफ्टनंट एमिल जेरोम मॅथ्यू केरळमधील कोची येथे राहायचा. तो भारतीय नौदलाचा अधिकारी होता. इकडे मुंबईत मारियाचे नीरजशी विवाहबाह्य संबंध होते.

एकेदिवशी मारियाचा पती एमिलला याबद्दल कळालं, त्याचा राग अनावर झाला आणि त्याने नीरजला चाकूने भोसकून ठार मारलं. नीरजचा खून केल्यानंतर मारिया आणि एमिल यांनी त्याच्या शरीराचे तुकडे करून मुंबईच्या बाहेरील भागात नेऊन त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी मारिया स्वतः मुंबई पोलिसांकडे नीरज हरवला असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेली.

या प्रकरणाचा तपास करत असताना मारियाच्या फ्लॅटच्या दाराच्या नॉबवर रक्ताच्या काही खुणा दिसल्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सर्व लिंक जोडण्याचा प्रयत्न केला. दारावर सापडलेला रक्ताचा नमुना नीरजच्या डीएनएशी जुळला होता, त्यामुळे नीरजची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं.

पुढे पोलिसांसमोर अभिनेत्री मारियाने पतीसह नीरजची हत्या केल्याची कबुली दिली. नीरजच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मॅथ्यूला एकूण 13 वर्षांची शिक्षा झाली. नीरजच्या हत्येसाठी मॅथ्यूला 10 वर्षांची शिक्षा झाली, तर पुरावे नष्ट केल्याबद्दल त्याला 3 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मॅथ्यूची पत्नी व अभिनेत्री मारिया सुसाईराज ही केवळ पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी आढळली. त्यामुळे तिला फक्त तीन वर्षांची शिक्षा झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या