नवी दिल्ली, 18 डिसेंबर : देशातील सर्वोच्च परीक्षा नागरी सेवा परीक्षा (IAS) उत्तीर्ण करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी IAS परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे 10 लाख उमेदवार 1000 पेक्षा कमी पदांसाठी अर्ज करतात. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार अतिशय सक्षम आणि भाग्यवान आहेत. गावातील एकजण आयएएस झाला तर संपूर्ण गाव त्याच्या नावाने ओळखले जाते. पण उत्तर प्रदेशात एक असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात किमान एक तरी IAS किंवा IPS आहे. या गावाला आयएएस आणि आयपीएसचे गाव म्हटले जाते. प्रत्येक घरात एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी - हे गाव यूपीच्या जौनपूर जिल्ह्यात आहे, तसेच या गावाचे नाव माधोपट्टी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या छोट्या गावात जवळपास 75 घरे आहेत. प्रत्येक घरातून एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत या गावाने देशाला 50 हून अधिक आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले आहेत. येथे केवळ मुले-मुलीच नाहीत, तर सुनाही अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 1914 पासून अधिकारी बनण्याची मालिका सुरू - माधोपट्टीमध्ये IAS होण्याची प्रक्रिया 1914 मध्ये सुरू झाली होती. मुस्तफा हुसेन हे गावातील पहिले सनदी अधिकारी झाले. यानंतर माधोपट्टीचे इंदू प्रकाश 1952 मध्ये आयएएस अधिकारी झाले. यानंतर गावातील अनेक जण नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊ लागले. आज माधोपट्टीतील तरुणांना अनेक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व वातावरण आहे. काही लोक या गावाला आयएएसचा कारखानाही म्हणतात. हेही वाचा - वडिलांच्या मेहनतीचं चीज! रिक्षाचालकाच्या मुलाचं UPSC मध्ये घवघवीत यश बिहारचे माजी मुख्य सचिव विनय कुमार सिंह आणि तामिळनाडूचे माजी मुख्य सचिव छत्रपाल सिंह हे देखील याच गावातील आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे दोन्ही अधिकारी खरे भाऊ आहेत. एवढेच नाही तर त्यांचे इतर दोन भाऊही आयएएस अधिकारी होते. यूपीमध्ये सैनिकांचे गाव - यूपीच्या जौनपूर जिल्ह्यात केवळ आयएएस आणि आयपीएस अधिकारीच निर्माण होत नाहीत, त्यासोबतच इतरही अनेक पदांवर लोकांची नियुक्ती केली जाते. गावातील बरेच लोक ISRO आणि BARC मध्ये देखील आहेत. त्याच वेळी, यूपीच्या गाझीपूर जिल्ह्यातील गहमर गाव ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात किमान एक तरी सदस्य सैन्यदलात आहे.