नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : डिजिटलायझेशन आणि ऑनलाइन व्यवहारांचं प्रमाण वाढलं, तसतशा ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या तर फारच मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन जॉबशी संबंधित कोणताही मेसेज किंवा मेल तुम्हाला आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि सावध व्हा. कारण तो मेसेज किंवा मेल तुमची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारांनी पाठवला असू शकतो.
अलीकडेच ईडीने एक कोटी रुपये रक्कम असलेली तब्बल 80 बँक खाती गोठवली आहेत. ईडीने ही कारवाई सुपर लाइफ अर्निंग अॅप्लिकेशनशी संबंधित प्रकरणात केली आहे. यामध्ये पार्ट टाइम नोकरीचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जात होती. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.
हे ही वाचा : ट्विटर अन् मेटापाठोपाठ आता अॅमेझॉनमध्येही होणार कर्मचारी कपात; सीईओंनी दिला दुजोरा
फोन पे, पेटीएममध्येही चौकशी
सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस बेंगळुरूमध्ये 16 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यादरम्यान आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही शोध मोहीम राबवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ईडीनी आरोपींच्या घरांवर आणि फोन पे, पेटीएम, गुगल पे आणि अॅमेझॉन पेसारख्या पेमेंट कंपन्यांच्या कार्यालयांचीही झडती घेतली. त्याचबरोबर एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि धनलक्ष्मी यांसारख्या बँकांविरोधातही मोहीम राबवली होती, असं ईडीच्या प्रवक्त्याने सांगितलं.
गेल्या वर्षी 3 मार्च रोजी साऊथ सायबर इकॉनॉमिक्स अँड नार्कोटिक क्राइम्स पोलीस स्टेशनने मेसर्स सुपर लाइक ऑनलाइन अर्निंग अॅप्लिकेशन आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. या संदर्भात ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला.
प्रकरणाचा चीनशी संबंध
पोलिसांनी 13 जानेवारी रोजी बेंगळुरू येथील प्रिन्सिपल सिटी सिव्हील व सेशन जजच्या कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. या प्रकरणी 50 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली होती. यामध्ये शेन लाँग आणि हिमानी या दोन चिनी नागरिकांचाही समावेश होता.
प्रकरणाचा तपशील देताना ईडीच्या प्रवक्त्याने सांगितलं की अॅप्लिकेशन युजर्सना काही पैसे गुंतवून सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करावे लागतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांना काही रक्कम मिळायची. मात्र, नंतर व्हिडिओ आणि फोटो शेअर करूनही युजर्सना पैसे मिळाले नाहीत. तसेच त्यांनी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता अॅपने त्यांचे पैसे ब्लॉक केले.
हे ही वाचा : चोरीसाठी काहीही, मॅक्डोनल्डसमधून 72 हजारांचे तेल केले लंपास, पण…
त्यामुळे जर तुम्हालाही असा मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर त्याला बळी पडू नका. तसेच तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. याद्वारे गुन्हेगार काही मिनिटांत तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.