नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : मेटा कंपनीमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी वाईट बातमी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी पुढचे काही महिने खूप कठीण असू शकतात. त्याचं कारण म्हणजे टेक क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचं कळतंय. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशातच आता मेटाच्या कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे. मेटाने कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी दुप्पट मेहनत करण्यास सांगितलं आहे. कंपनीत या पुढे नोकरी करायची असेल, तर 200 टक्के काम करावं लागेल, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय. जे कर्मचारी काम करू शकत नाहीत, त्यांना कंपनी नोकरीवरून कमी करू शकते असंही कंपीने स्पष्ट केलं आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.
इनसाइडरशी झालेल्या एका संभाषणात मेटा कर्मचाऱ्याने सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या मेसेजबद्दल सांगितलं. ‘मार्क झुकरबर्गचा मेसेज अतिशय स्पष्ट होता. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे तीन महिने आहेत. 200 टक्के प्रयत्न करा किंवा तुम्हाला हे सर्व आवडत नसेल तर राजीनामा द्या,’ असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मेटा स्टॉकच्या किमती सातत्याने घसरत असताना कर्मचाऱ्यांना दुप्पट मेहनत करण्यास सांगितलं जातंय. शिवाय कंपनीला मेटाव्हर्सच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यात अडचणी येत आहेत.
हे ही वाचा : IT Jobs: दिवाळीत IT कंपन्यांचा बंपर धमाका; Amazon ते Paytm मध्ये बंपर जॉब ओपनिंग्स; करा अर्ज
झुकरबर्ग यांच्याकडून कर्मचाऱ्यांवर मेहनत करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्याच वेळी, मेटाने आपल्या टीम्स आणि मॅनेजरदेखील बदलले आहेत. एका मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्याच्या नोकऱ्याही सुरक्षित नाहीत. एका कर्मचाऱ्याने आरोप केला, “झुकरबर्गनी म्हटलंय की ते बॅकअप प्लॅन घेऊन येत आहे आणि मीही तेच करत आहे.”
कंपनीच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार आहे. याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसणार आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, मेटाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या तीन कंपन्यांमध्ये जगभरात 83,500 कर्मचारी काम करत आहेत. मेटा कर्मचाऱ्याच्या मते, “पुढील वर्षी 20 टक्के कर्मचारी कमी होतील, अशी चर्चा आहे, पण हे कधी होईल ते माहीत नाही.”
हे ही वाचा : ‘या’ मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये पर्मनंट वर्क फ्रॉम होम जॉब्स; पात्र असाल तर चान्स सोडू नका
इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, मेटा प्रतिनिधीने 27 जुलै रोजी कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या अहवालाबद्दल माहिती देताना झुकरबर्गच्या वक्तव्याविषयी माहिती दिली. झुकेरबर्ग म्हणाले की, ‘मेटाने पुढील वर्षभरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना आखली आहे. अनेक टीम्स कमी केल्या जाणार आहेत, जेणेकरून आम्ही वर्कफोर्स इतर भागात ट्रान्सफर करू शकू,’ असा इशाराही झुकरबर्ग यांनी दिला होता.