JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षा लांबणीवर पडणार? हक्क तर दिला पण ट्रान्सजेंडर्ससाठी निकषच तयार नाहीत

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षा लांबणीवर पडणार? हक्क तर दिला पण ट्रान्सजेंडर्ससाठी निकषच तयार नाहीत

19 मार्च रोजी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी प्रस्तावित असलेल्या लेखी परीक्षा प्रक्रियेला आता ट्रान्सजेंडर समुदायाने विरोध दर्शवला आहे

जाहिरात

लेखी परीक्षा लांबणीवर पडणार?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 मार्च:  डिसेंबरमध्ये मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय देत पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी ट्रान्सजेंडर्सना दिली होती. पण, शारीरिक चाचणीचे निकष ठरलेले नसल्याने किंवा राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्सची शारीरिक चाचणीच तयार न केल्याने गेल्या दोन महिन्यांत झालेल्या चाचण्यांना बसण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे 19 मार्च रोजी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी प्रस्तावित असलेल्या लेखी परीक्षा प्रक्रियेला आता ट्रान्सजेंडर समुदायाने विरोध दर्शवला आहे. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिलंय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 72 ट्रान्सजेंडर्सनी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण, राज्य सरकारने ट्रान्सजेंडर उमेदवारांच्या शारीरिक चाचण्यांसाठी निकष निश्चित केलेले नाहीत, असं त्या उमेदवारांना सांगण्यात आलं होतं. 28 वर्षीय ट्रान्स पर्सन चांद तडवी जळगावचे आहेत, त्यांनीही नोकरीसाठी अर्ज केला आहे. ते म्हणाले, “आम्ही 14 फेब्रुवारी रोजी आमच्या शारीरिक चाचणीच्या निकषासाठी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु आम्हाला कोणतंही योग्य उत्तर मिळालं नाही. मला धुळ्याच्या मैदानातून हाकलून लावण्यात आलं. तिथे इतर अर्जदार मात्र होते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मला परीक्षेला हजर न होण्यास सांगण्यात आलं. हायकोर्टाच्या निर्णयानंतर महिला प्रवर्गातून केलेला माझा अर्ज मी रद्द केला. आता, मला कॅटेगरी बदलल्याचं दुःखं आहे, कारण एक महिला उमेदवार म्हणून मला परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली असती.” दरम्यान, राज्याने भरती प्रक्रिया सुरू ठेवली आहे आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. “तोपर्यंत ट्रान्सजेंडर्ससाठी निकष निश्चित केले नसल्यास आम्ही पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा घेण्यास परवानगी देणार नाही, यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो कारण हायकोर्टाने 28 फेब्रुवारीपूर्वी ट्रान्सजेंडरसाठी निकष निश्चित करण्याचे निर्देश दिले होते,” असं चांद तडवी म्हणाले. ट्रेनिंग व स्पेशल स्क्वॉड्स विभागाचे महासंचालक संजय कुमार म्हणाले, “लेखी परीक्षा नुकतीच प्रस्तावित करण्यात आली आहे आणि आम्ही ट्रान्सजेंडरसाठी निकष अंतिम करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. येत्या काही दिवसांत त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जर 19 मार्चपर्यंत निकष निश्चित झाले नाहीत तर आमच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय आहे. ” दरम्यान, आता निकष मंजूर होऊन ट्रान्सजेंडर्सच्या चाचण्या सुरू होतात की मग महिला व पुरूष उमेदवारांच्या लेखी परीक्षा रद्द होतील, हे येत्या काळातच कळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या